मावेजाचा प्रश्न १५ दिवसांत निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:43 AM2020-12-11T04:43:41+5:302020-12-11T04:43:41+5:30
परभणी : शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्न १५ दिवसांत सोडवावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय ...
परभणी : शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्न १५ दिवसांत सोडवावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते मंत्रालयाचे अधीक्षक अभियंता अंशुमन श्रीवास्तव यांना दिल्या आहेत.
कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराबाहेरून वळणरस्ता काढण्यात आला आहे. ही प्रक्रिया ३ ते ४ वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याने शहराअंतर्गत राष्ट्रीय महामार्गाचा व वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक वेळी या प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. या सर्व अडचणी पार करून गतवर्षी वळण रस्त्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया राबविण्यात आली. शेतकऱ्यांची जमीननिहाय यादी तयार करून त्यांच्याकडून हरकतीही घेण्यात आल्या. या शेतकऱ्यांच्या मावेजापोटीची रक्कमही जाहीर करण्यात आली. मात्र, ही रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली नाही. मावेजाची प्रक्रिया करीत असताना त्यासाठी भूमीराशी पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया करावयाची आहे. परंतु, त्यास विलंब लागत असल्याने जमीन संपादनाचा आणि मावेजाचा प्रश्न मागील अनेक महिन्यांपासून रखडला आहे.
गुरुवारी या प्रश्नावर माजी महापौर प्रताप देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यांना रखडलेल्या प्रश्नाची माहिती दिली. बाह्यवळण रस्त्याच्या मावेजासाठी अक्षम्य दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर अजित पवार यांनी थेट केंद्रीय रस्ते मंत्रालयातील अधीक्षक अभियंता अंशुमन श्रीवास्तव यांना फोन करून येत्या १५ दिवसांत भूमीराशी पोर्टलची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना त्यांचा मावेजा अदा करावा, अशा सूचना केल्या. यावेळी अधीक्षक अभियंत्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत हा निधी वर्ग केला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. याप्रसंगी कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रवीण देशमुख यांचीही उपस्थिती होती.
६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर
परभणी शहराच्या बाहेरून १४.५ किमी अंतराचा बाह्यवळण रस्ता मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी पारवा, धर्मापुरी, परभणी, वांगी आणि असोला या पाच गावांची २१९.७५ हेक्टर जमीन संपादित करावयाची आहे. जमीन संपादनासाठी ६८ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून, मावेजा अदा करण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे.
बाह्यवळण रस्त्याच्या प्रश्नांवर वारंवार पाठपुरावा सुरू आहे. परंतु, प्रशासकीय उदासीनता असल्याने निधी प्राप्त होवूनही जमीन संपादन रखडले आहे. याप्रश्नी माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना सूचना केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
प्रवीण देशमुख, परभणी