"आदरणीय चंद्रकांतदादा हे पहा खड्डे" ; गंगाखेड-परभणी रस्त्यावरील खड्डयात विरोधी पक्षनेते धंनजय मुडे यांचा सेल्फी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 04:36 PM2018-09-01T16:36:32+5:302018-09-01T16:37:24+5:30
वाशिम येथे कार्यक्रमाला जाताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेड -परभणी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांसोबत सेल्फी काढला.
गंगाखेड (परभणी ) : वाशिम येथे कार्यक्रमाला जाताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेड -परभणी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांसोबत सेल्फी काढुन गेल्या चार वर्षात रस्ते दुरुस्तीवर खर्च केलेले हजारो कोटी रुपये नेमके कुणाच्या खिशात गेले असा प्रश्न राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना विचारला आहे.
परळी मुक्कामी असलेले राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे आज परळी कृऊबा सभापती सूर्यभान नाना मुंडे, डॉ. देविदास चव्हाण, बाळासाहेब सोनवणे यांच्या समवेत गंगाखेड-परभणी मार्गे वाशिम येथील कार्यक्रमासाठी जात होते. यादरम्यान गंगाखेड-परभणी मार्गावर पडलेल्या खड्डयामुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था त्यांच्या लक्षात आली.
आदरणीय @ChDadaPatil दादा,गंगाखेड -परभणी रस्त्यावरील हे पहा खड्डे. सरकारच्या नाकर्तेपणा मुळे राज्यात इतके विक्रमी खड्डे झाले आहेत की 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड' आता दखल घ्यावी. रस्ते दुरुस्तीवर मागील 4 वर्षात खर्च केलेले हजारो कोटी रु नेमके कोणाच्या खिशात गेले ? #SelfieWithPotholespic.twitter.com/gyMvPYdEWF
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 1, 2018
या रस्त्याची खड्डयांमुळे झालेली अवस्था पाहून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या मार्गावर पडलेल्या खड्डयांजवळ आपल्या वाहनांचा ताफा थांबवून चक्क खड्डयात बसून सेल्फी काढला. यानंतर हा सेल्फी मुंडे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला. तसेच,"आदरणीय दादा, गंगाखेड -परभणी रस्त्यावरील हे पहा खड्डे. सरकारच्या नाकर्तेपणा मुळे राज्यात इतके विक्रमी खड्डे झाले आहेत की 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'ने आता दखल घ्यावी. रस्ते दुरुस्तीवर मागील ४ वर्षात खर्च केलेले हजारो कोटी रु नेमके कोणाच्या खिशात गेले ? असा प्रश्न उपस्थित करून जोरदार टीका केली.