ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद; कर्मचाऱ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 AM2021-03-07T04:16:54+5:302021-03-07T04:16:54+5:30
कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावापासून सुरक्षा म्हणून राज्यातील नागरिकांसाठी शासनाने कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध करून देत जानेवारी महिन्यात या लसीकरणाला सुरुवात ...
कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावापासून सुरक्षा म्हणून राज्यातील नागरिकांसाठी शासनाने कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध करून देत जानेवारी महिन्यात या लसीकरणाला सुरुवात केली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सर्वप्रथम आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, खासगी डॉक्टर तसेच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, तलाठी आदींना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली; मात्र आरोग्य व पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी लस घेतल्यानंतर हे दोन विभाग वगळता अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मात्र लस घेण्यास तेवढा रस दाखविला नसल्याचे दिसत आहे. तर नगर परिषद कार्यालयातील १३० कर्मचाऱ्यांपैकी बोटावर मोजण्या इतक्याच कर्मचाऱ्यांनी लस घेतली. अन्य कर्मचाऱ्यांनी या लसीकरणाकडे दुर्लक्ष करत पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
९०० ज्येष्ठांनी घेतली लस
१ मार्चपासून तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयासह पिंपळदरी, महातपुरी व कोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करण्यात आले. यास ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात ६ मार्चपर्यंत ४१२ जणांनी व ५ मार्च पर्यंत महातपुरी येथे १३७, पिंपळदरी येथे २१७ व कोद्री येथे १९० अशा एकूण ९६२ ज्येष्ठ नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. शासकीय विभागात कार्यरत राहूनसुद्धा कोविड प्रतिबंधक लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय स्तरावर वरिष्ठ अधिकारी जाब विचारणार का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
कोरोना विषाणूंपासून सुरक्षा म्हणून शासकीय अधिकारी, कर्मचारी, खासगी डॉक्टर व ज्येष्ठ नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील महातपुरी, पिंपळदरी व कोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांनी केले आहे.