अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 06:53 PM2020-11-28T18:53:00+5:302020-11-28T18:54:18+5:30
कंत्राटी कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.
परभणी : शहरातील महानगरपालिकेच्या जुन्या सेंट्रल नाका भागातील अग्निशमन दलाच्या केंद्रामध्ये सर्व १३ कर्मचारी कंत्राटी असल्याने या कर्मचाऱ्यावरच अग्निशमन दलाचा डोलारा अवलंबून आहे.
परभणी शहराची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाखांच्या घरात आहे. या सर्व नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने परभणी शहरातील सेंट्रल नाका भागात अग्निशमन दलाचे केंद्र कार्यरत आहे. यामधून शहर व परिसरातील आगीच्या घटना आटोक्यात आणण्याचे काम केले जाते.
या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी व आधुनिक साहित्याचा भरणा असणे गरजेचे आहे. मात्र महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. या केंद्रात ४ फायरमन, ४ मदतनिस, ५ वाहन चालक कार्यरत असून, हे सर्व कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करतात. त्याचबरोबर या केंद्रात ३ वाहने असून, त्यातील केवळ एकच वाहन हे अत्याधुनिक स्वरुपाचे आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.
९६ आगीच्या घटना
परभणी व शहर परिसरात १ मार्च ते ३० ऑक्टोबर या काळात आगीच्या ९६ घटना घडल्या आहेत. यामध्ये ८३ फायरमन तर १३ घटनांमध्ये रेस्क्यू करून अनेक नागरिकांना संकटातून बाहेर काढण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षितेच्या जबाबदारीचा भार एका अग्नीशमन केंद्रावर येत आहे. त्यामुळे मनपाच्या वतीने अग्नीशमन दलाची केंद्रे वाढिवण्याची मागणी होत आहे.
अत्याधुनिक साहित्याचा अभाव
शहरातील कानाकोपऱ्यात घडलेल्या आगीच्या घटना विझवण्याचे काम परभणी येथील अग्नीशमन केंद्र करीत असले तरी या ठिकाणी या केंद्रांकडे केवळ तीनच वाहने उपलब्ध आहेत. त्यातील दोन वाहने जुनी असून, एकच वाहन आधुनिक यंत्रांनी युक्त आहे. त्यामुळे शहरात घडणाऱ्या घटना आटोक्यात आणण्यासाठी कसरत करावी लागते.
प्रशिक्षीत कर्मचारी मिळेनात
परभणी येथील अग्नीशमन दलामध्ये १३ कर्मचारी हे कंत्राटी स्वरुपाचे आहेत. यामध्ये फायरमन, मदतनिस व वाहन चालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे कर्मचारी मनपाच्या वसाहतीमध्ये वास्तव्याला राहत नाहीत. त्यातही एक कर्मचारी मनपातील पाणीपुरवठा विभागातील चालक आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशिक्षीत कायमस्वरुपी कर्मचारी असणे गरजेचे आहे.
मनपाच्या अग्नीशमन दलामध्ये १३ कर्मचारी असून, हे कंत्राटी तत्वावर घेण्यात आले आहेत. अत्याधुनिक साधनांसह ३ वाहने आहेत. त्याचबरोबर हायड्रोलिक, केमीकल, गॅसच्या घटनाही आटोक्यात आणण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा आहे. शहरातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना वेळेत आटोक्यात आणण्यास मदत होते.
-दीपक कानोडे, विभागप्रमुख