मराठवाड्यात पाच जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पाचवी, आठवीच्या नव्या वर्गांवर प्रतिबंध; शिक्षण उपसंचालकांचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 07:13 PM2018-08-23T19:13:55+5:302018-08-23T19:14:51+5:30

राज्याच्या शिक्षण विभागाने फक्त पाच जिल्ह्यांसाठी नियम घालून दिले आहेत़

Restrictions on new classes of classes 5th, VIII of Marathwada schools; Education Deputy Director's Order | मराठवाड्यात पाच जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पाचवी, आठवीच्या नव्या वर्गांवर प्रतिबंध; शिक्षण उपसंचालकांचे आदेश 

मराठवाड्यात पाच जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पाचवी, आठवीच्या नव्या वर्गांवर प्रतिबंध; शिक्षण उपसंचालकांचे आदेश 

googlenewsNext

परभणी : जिल्हा  परिषद शाळांना पाचवी व आठवीचे नवे वर्ग सुरू करण्यासंदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाने फक्त पाच जिल्ह्यांसाठी नियम घालून दिले आहेत़ या नियमांमुळे जि़प़ शाळांना पाचवी व आठवीचे नवे वर्ग सुरू करणे सोपे राहिलेले नाही़ 

जिल्हा परिषद शाळांनी सरसकट पाचवी व आठवीचा वर्ग नव्याने सुरू करण्यासंदर्भात राज्याचे शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी नुकताच परभणी, हिंगोली, जालना, बीड व औरंगाबाद या पाच जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे आदेश काढला आहे़ या आदेशामुळे जि़प़ शाळांना पाचवी व आठवीचे नवे वर्ग सुरू करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे़ गोसावी यांच्या आदेशानुसार शासन निर्णय २ जुलै २०१३ नुसार राज्यातील प्राथमिक अथवा उच्च प्राथमिक शाळांमध्ये आवश्यकतेनुसार पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात काही निकष देण्यात आले आहेत.

त्यानुसार ज्या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे व  १ किमी परिसरात पाचवीचा त्या माध्यमाचा वर्ग नाही, अशा शाळांमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग देण्यात यावा़ ज्या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे व एक किमी परिसरात पाचवीच्या त्याच माध्यमाचा वर्ग उपलब्ध आहे, अशा ठिकाणी अन्य शाळांमध्ये पाचवीचा वर्ग देण्यात येऊ नये़ ज्या ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे व ३ किमी परिसरात इयत्ता आठवीचा वर्ग नाही, अशा शाळांमध्ये इयत्ता आठवीचा वर्ग देण्यात यावा, ज्या ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत व ३ किमी परिसरामध्ये त्याच माध्यमाच्या आठवीचा वर्ग उपलब्ध आहे, अशा शाळांमध्ये आठवीचा वर्ग देण्यात येऊ नये, असे या आदेशात गोसावी यांनी म्हटले आहे़ 

जि़प़च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील व खाजगी व्यवस्थापनेच्या सर्व शाळांचा आढावा घेऊन जेथे जेथे अशा प्रकारचे वर्ग आवश्यक असेल त्याचा एक रितसर संयुक्त प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालकांकडे मान्यतेसाठी पाठवावा आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथी आहे तेथे पाचवी वर्ग जोडण्यात आलेला आहे व जिथे सातवी आहे तेथे आठवीचा वर्ग सरसकट देण्यात आला आहे का?, याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही या आदेशात  गोसावी यांनी म्हटले आहे़ 

खाजगी शाळांना धार्जिणा आदेश
शिक्षण उपसंचालक गोसावी यांनी जिल्हा परिषद शाळांच्या अनुषंगाने काढलेला आदेश हा खाजगी शिक्षण संस्थाचालक धार्जिणा असल्याची शिक्षण वर्तुळात चर्चा आहे़ नैसर्सिक पटसंख्या वाढीनुसार जिल्हा परिषद शाळांनी पाचवी व आठवीचा वर्ग वाढविल्यास काय नुकसान होणार आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ एकीकडे २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा शासनस्तरावरून घाट घातला गेला़ त्यानुसार जिल्ह्यातील आठ शाळांवर गंडात्तर आले़ आता पाचवी व आठवीच्या नव्या वर्गांवरही प्रतिबंध घालण्यात आल्याने शासनस्तरावरून निर्णय कोणासाठी घेतले जातात, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ 

पाच जिल्ह्यांसाठीच आदेश
शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी काढलेला हा आदेश मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, जालना, बीड व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांसाठीच आहे़ त्यामुळे या पाच जिल्ह्यांमधील जि़प़ शाळांसाठीच हा आदेश का काढण्यात आला आहे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरूनच चौकशी होणे आवश्यक आहे़ 

Web Title: Restrictions on new classes of classes 5th, VIII of Marathwada schools; Education Deputy Director's Order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.