लोकरंग गीतगायन स्पर्धेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:42 AM2021-01-13T04:42:07+5:302021-01-13T04:42:07+5:30
सोनपेठ : जिल्हा परिषदेच्यावतीने घेतलेल्या लोकरंग राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात पुणे जिल्ह्यातील केंजळ येथील जिल्हा ...
सोनपेठ : जिल्हा परिषदेच्यावतीने घेतलेल्या लोकरंग राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात पुणे जिल्ह्यातील केंजळ येथील जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक पटकावला. ६ जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी हा निकाल जाहीर केला. या स्पर्धेत १८ जिल्ह्यातील २७२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ऑनलाईन आणि ऑफलाईन अभ्यासक्रमांबरोबरच लोकरंग राज्यस्तरीय गीतगायन ऑनलाईन स्पर्धेेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यातील पुणे, मुंबई, रायगड, औरंगाबाद, चंद्रपूर जिल्ह्यांसह १८ जिल्ह्यातील २७२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यात पुणे जिल्ह्यातील केंजळ येथील प्राथमिक शाळेतील प्राजक्ता बाठे व गीतमंच यांनी प्रथम क्रमांक मिळविला. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुक्तेश्वर कऱ्हाळे व संचाने द्वितीय क्रमांक पटकावला. पुणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वेदिका घोगरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. तर पेन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची हार्दिका पाटील, सातारा जिल्ह्यातील मेंढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ओंकार जवळ, सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील अंजली तुपसमुद्रे या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आले. ही स्पर्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, शिक्षण सभापती अंजलीताई आणेराव, डॉ. सुचिता पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यशस्वीतेसाठी डी. के. पवार यांच्यासह सोनपेठ तालुक्यातील वाणीसंगम येथील जिल्हा परिषद प्राथिमक शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न केले.