रिक्त पदे भरण्याची मागणी करत ‘महसूल’चे कामबंद; परभणीत ७०० कर्मचाऱ्यांचा सहभाग
By मारोती जुंबडे | Published: July 15, 2024 06:03 PM2024-07-15T18:03:55+5:302024-07-15T18:04:28+5:30
महसूल विभागातील ३५ ते ४० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमित कामकाजावरच त्याचा मोठा परिणाम दिसून येतो.
परभणी: महसूल विभागातील ३५ ते ४० टक्के पदे रिक्त आहेत. तसेच आकृतीबंध मंजूर न झाल्यामुळे रिक्त पदे भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे नियमित कामकाजावरही परिणाम होत असल्याने ही पदे तत्काळ भरण्यासाठी जिल्ह्यातील कोतवालासह अव्वल कारकुन असे एकूण ७०० कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे महसूलची कामे खोंळबली आहेत.
महसूल विभागातील ३५ ते ४० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमित कामकाजावरच त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. त्यातच आता राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. त्यामुळे नायब तहसीलदारांसह उपलेखपालपर्यंत नवीन पद भरती करून या योजनेचे काम त्यांच्यावर सोपवावे अशी मागणी परभणी जिल्हा गट क महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र तोडगा निघाला नसल्याने १५ जुलै सकाळी ११ वाजल्यापासून महसूल कर्मचारी संघटनाच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे नानासाहेब भेंडेकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे, पंचशिल करुणा बगाटे, विठ्ठल मोरे, वैजनाथ फड याचबरोबर कोतवालासह अव्वल कारकुनापर्यंत ७०० कर्मचारी सहभागी झाले आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या कामावर परिणाम
महसूल विभागातील जिल्ह्यातील जवळपास सातशे कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या कामावर परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासन व शासनाने या संपावर तोडगा काढून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांना मदत होईल या अनुषंगाने प्रयत्न करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहेत.