गंगाखेड येथील जप्त वाळूसाठ्याच्या लिलावातून शासनाला मिळाला ८० लाखांंचा महसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 04:07 PM2017-11-17T16:07:51+5:302017-11-17T16:10:10+5:30
मागील काही दिवसात अनाधिकृतरित्या साठा केलेली वाळू महसूल प्रशासनाने जप्त केली होती. मंगळवारी १५९ वाळू साठ्यांपैकी ६४ वाळूसाठ्यांचा लिलाव करण्यात आला.
गंगाखेड (परभणी ) : मागील काही दिवसात अनाधिकृतरित्या साठा केलेली वाळू महसूल प्रशासनाने जप्त केली होती. मंगळवारी १५९ वाळू साठ्यांपैकी ६४ वाळूसाठ्यांचा लिलाव करण्यात आला. त्यातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत ८० लाख रुपये जमा झाले आहेत.
गंगाखेड तालुक्यातून गोदावरी नदीपात्रातील वाळूचा बेसुमार उपसा केला जातो. तालुक्यात ठिकठिकाणी वाळूसाठ्याचे ढिगारे करुन ठेवले होते. तहसील प्रशासाने हे अवैध वाळूसाठे जप्त केले. त्यात पिंपरी परिसरात ६४, मसला २७, सुरळवाडी १, कासारवाडी ५, गंगाखेड शहर १६, मैराळ सावंगी ५, गौंडगाव २, महातपुरी २८, मुळी ५ असे १५९ वाळूसाठे जप्त करण्यात आले होते. जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया तहसील प्रशासनाने सुरु केली आहे.
या प्रक्रियांतर्गत उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली लिलाव करण्यात आला. त्यात ६४ वाळूसाठ्यांचा लिलाव झाला असून ४ हजार ४७३ ब्रास वाळू लिलावाद्वारे विक्री करण्यात आली. यातून ८० लाख ६२ हजार ५१८ रुपयांचा महसूल प्रशासनाला मिळाला आहे. आतापर्यंत ६४ वाळूसाठ्यांचा लिलाव पूर्ण झाला आहे. महातपुरी परिसरातील शासकीय गायरान जमिनीवर अज्ञात व्यक्तींनी वाळूसाठे केले आहेत. परंतु, या साठ्यासाठी कोणीही बोली बोलली नाही. त्यामुळे महातपुरी परिसरातील ६ साठ्यांचा लिलाव झाला नाही. दरम्यान, ही सर्व वाळू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात आणून टाकली आहे.
कोट्यवधींचे वाळूसाठे पडून
दरम्यान, तहसील प्रशासनाने जप्त केलेल्या १५९ वाळूसाठ्यांपैकी आणखी ९५ वाळूसाठे जागीच पडून आहेत. या वाळूसाठ्यांचा लिलाव झाला तर महसूल प्रशासनाच्या तिजोरीत दीड ते दोन कोटी रुपये जमा होणार आहेत. पडून असलेल्या वाळूसाठ्यांचा लिलाव करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे तहसील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.