वजन-मापांच्या नूतनीकरणातून ७४ लाखांचा महसूल शासनाच्या तिजोरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:03+5:302021-03-23T04:18:03+5:30

परभणी : कोरोनाच्या काळात एकीकडे निधीअभावी विकास कामे ठप्प असली तरी येथील वैधमापन शास्त्र विभागाने मात्र वजन-मापांच्या नूतनीकरणातून ७४ ...

Revenue of Rs. 74 lakhs from renewal of weights and measures in the treasury of the government | वजन-मापांच्या नूतनीकरणातून ७४ लाखांचा महसूल शासनाच्या तिजोरीत

वजन-मापांच्या नूतनीकरणातून ७४ लाखांचा महसूल शासनाच्या तिजोरीत

Next

परभणी : कोरोनाच्या काळात एकीकडे निधीअभावी विकास कामे ठप्प असली तरी येथील वैधमापन शास्त्र विभागाने मात्र वजन-मापांच्या नूतनीकरणातून ७४ लाख ३१ हजार २५९ रुपयांचा महसूल फेब्रुवारी अखेरपर्यंत शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे.

जिल्ह्यातील विविध व्यावसायिकांकडून पदार्थांच्या मोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या वजन-मापांचे दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे असते. या नूतनीकरणासाठी वैधमापन शास्त्र विभागाला दरवर्षी ठराविक उद्दिष्ट निश्चित करून दिले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने उद्दिष्ट देण्यात आले नाही. अशाही परिस्थितीत मागील वर्षाचे उद्दिष्ट ग्राह्य धरून वैधमापन शास्त्र विभागाने फेब्रुवारी महिन्याअखेर ७४ लाख ३१ हजार २५९ रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे.

परभणी आणि हिंगोली अशा दोन जिल्ह्यांचा कारभार पाहणाऱ्या या कार्यालयात एकूण चार विभाग आहेत. परभणी १ या विभागाला १८ लाख ३० हजार रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १५ लाख ३४ हजार २०४ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. परभणी २ विभागात २० लाख १३ हजार ४३० रुपये, सेलू विभागातून १७ लाख ७८ हजार ९९० रुपये, तर हिंगोली विभागातून २१ लाख ४६ हजार ३५ रुपयांचा महसूल फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा करण्यात आला आहे.

बाजारपेठ भागातील व्यापारी, पेट्रोल पंप, औद्योगिक वसाहती, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन अशा शासकीय संस्थांसह किरकोळ विक्रेते, तसेच ज्या ज्या ठिकाणी वजनाचा वापर होतो त्या ठिकाणाहून हा महसूल एकत्रित केला जातो. त्याचप्रमाणे वजन-मापांमध्ये हेराफेरी आढळल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार या विभागाला दिले आहेत.

एकंदर मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. परभणी जिल्ह्याला विकास निधी प्राप्त झाला नसल्याने विकासकामेही ठप्प राहिली, अशाही परिस्थितीत वैधमापन शास्त्र विभागाने मात्र उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. मार्चअखेरपर्यंत मागील वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दीड लाखाचा दंड वसूल

वजन-मापांमध्ये हेराफेरी केल्याच्या कारणावरून जिल्ह्यात दंडात्मक कारवाई हाती घेण्यात आली. ५२ जणांकडून १ लाख ४९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

११४८ व्यापाऱ्यांची नोंदणी

परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांतील ठोक, तसेच किरकोळ अशा एकूण १ हजार १४८ व्यापाऱ्यांची या विभागाकडे नोंदणी आहे. या व्यापाऱ्यांकडून वजन-मापांचे प्रत्येक वर्षी नूतनीकरण केले जाते. नूतनीकरणापोटी ठरवून दिलेल्या नियमानुसार ५ रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंतचा मुद्रांक वसूल केला जातो.

Web Title: Revenue of Rs. 74 lakhs from renewal of weights and measures in the treasury of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.