परभणी जिल्ह्यात नद्यांनी गाठली धोक्याची पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 02:52 PM2021-09-30T14:52:37+5:302021-09-30T14:54:03+5:30
पैठण येथील जायकवाडी प्रकल्प तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे.
परभणी : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पासह गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने जिल्ह्यात गोदावरी पूर्णा आणि दुधना या तीनही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून, जिल्हावासीयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात पाऊस आता थांबला आहे; परंतु प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक सुरूच असल्याने प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.
पैठण येथील जायकवाडी प्रकल्प तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे. त्यामुळे सर्व बंधारे फुल्ल झाले असून, या बंधाऱ्यातून ही नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी अनेक भागात गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याजवळ गोदावरी नदीची धोक्याची पातळी ३९६ मीटर एवढी असून, सध्या या ठिकाणी गोदावरी नदीची पाणी पातळी ३९१ मीटर इतकी आहे. त्याचप्रमाणे परभणी -जिंतूर रस्त्यावर झरी पुलाजवळ दुधना नदीची धोक्याची पातळी ३८० मीटर एवढी असून, सध्या या नदीची पाणीपातळी ३८२ मीटर इतकी आहे. तर गंगाखेड शहरात गोदावरी नदीची धोक्याची पातळी ३७५ मीटर एवढी असून सध्या या नदीत ३७० मीटर पाणी पातळी आहे. तीनही नद्यांनी धोक्याची पाणी पातळी गाठली असल्याने या नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राहाटी पुलावरील वाहतूक बंदच येलदरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कमी झाला असला तरी नदीपात्रातील पाणीपातळी अद्याप कमी झालेली नाही. परभणी- वसमत रस्त्यावरील राहाटी येथील पुलावरून हे पाणी वाहत आहे. त्यामुळे बुधवारी रात्री या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाणी कमी होण्याची शक्यता असल्याने सायंकाळनंतर वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.