मंडळाचा दुष्काळात समावेशासाठी ग्रामस्थांचा रास्तारोको
By ज्ञानेश्वर भाले | Published: December 2, 2023 04:18 PM2023-12-02T16:18:32+5:302023-12-02T16:21:32+5:30
मानवत तालुक्यातील ताडबोरगाव मंडळ आणि रामपुरी मंडळ यांचा दुष्काळ यादीमध्ये समावेश करण्याची मागणी
मानवत (जि. परभणी) : तालुक्यातील ताडबोरगाव मंडळ, रामपुरी मंडळ यांचा दुष्काळ यादीमध्ये समावेश करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी दुपारी शहरातील महाराणा प्रताप चौकात रास्तारोको आंदोलन केले.
मानवत तालुक्यातील ताडबोरगाव मंडळ आणि रामपुरी मंडळ यांचा दुष्काळ यादीमध्ये समावेश करावा. शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय अनुदान हे पिककर्जापोटी कपात करून नये. पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी. सिंचन विहीरींचे कुशलचे बिल हे लवकरात लवकर लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात यावे. या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यासाठी मानवत पाथरी रस्त्यावरील महाराणा प्रताप चौक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना मानवतच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात.
या आंदोलनात नामदेव काळे, दत्ताराव परांडे, गोविंद घाडगे, लक्ष्मण शिंदे, गोपाळराव काळे, महादेव काळे, बाजार समितीचे संचालक सूरज काकडे, कृष्णा शिंदे, विशाल यादव, अशोक काळे प्रकाश काळे, संतोष आंबेगावकर, बाळासाहेब काळे,प्रकाश काळे, विठ्ठलराव काळे, माधव शिंदे आदी शेतकरी सहभागी झाले होते. प्रशासनाकडून मंडळ अधिकारी जगन बिडवे तलाठी नागरगोजे यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. पोनि. दीपक दंतुलवार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनानंतर मानवत पाथरी मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.