परभणीतील रस्त्यांची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:45 PM2019-10-22T23:45:24+5:302019-10-22T23:46:19+5:30
दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन वसाहतीत रस्त्यावर साचलेला चिखल आणि प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन वसाहतीत रस्त्यावर साचलेला चिखल आणि प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
मागील सहा महिन्यांपासून शहरातील रस्ते अक्षरश: खड्डेमय झाले आहेत. प्रत्येक रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे हे खड्डे आणखीच मोठे झाले आहेत. देशमुख हॉटेल ते देशमुख गल्ली, सुपरमार्केट ते वसंतराव नाईक यांचा पुतळा, राजगोपालाचारी उद्यानाच्या पाठीमागील बाजूने नवा मोंढा पोलीस ठाण्यापर्यंतचा रस्ता, जामनाका ते दर्गा रोड, नगरपालिका कॉलनी परिसर, रायगड कॉर्नर ते जुना पेडगाव रोड, नानलपेठ ते नांदखेडारोड, गणपती चौक ते विद्यानगर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून जागोजागी रस्ता उखडला असल्याने वाहनधारकांना वाहने चालविण्यासाठी कसरत करावी लागते. या शिवाय शहरातील नवीन वसाहतीमधील रस्त्यांची तर मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काळ्या मातीमुळे या रस्त्यांवर चिखल झाला असून नागरिकांना चिखलातून मार्ग काढीत घर गाठावे लागत आहे. कारेगाव रोड भागातील दत्तनगर, आशीर्वादनगर, विजयश्री नगर, समझोता कॉलनी, आनंदनगर, दत्तधाम परिसरातील सत्कार कॉलनी, आरोग्य कॉलनी, विक्रम सोसायटी या भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
संपूर्ण पावसाळ्यामध्ये या रस्त्यांवर चिखल साचला होता. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यामुळे काही प्रमाणात त्रास कमी झाला होता; परंतु, दोन दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांची अवस्था जैसे थे झाली आहे. मुख्य रस्त्यांवरील खड्ड्याचे आकार वाढले आहेत. खड्डे चुकवत वाहनधारकांना वाहने चालवावी लागत आहेत. तर वसाहतीमधील रस्त्यांवरील चिखल तुडवत रस्ता पार करावा लागत आहे.
मनपाने रस्त्यांची किमान डागडुजी करावी, मुरुम टाकून रस्ते तात्पुरत्या स्वरुपात का होईना; वाहतुकीयोग्य करुन वाहनधारकांचा त्रास कमी करावा, अशी मागणी होत आहे.