परभणीत दरोडेखोरांचे कौर्य; शेतमजूर महिलेवर सामूहिक अत्याचार, कुटुंबावर जीवघेणा हल्ला

By राजन मगरुळकर | Updated: January 3, 2025 19:38 IST2025-01-03T19:35:16+5:302025-01-03T19:38:37+5:30

परभणी तालुक्यातील पारवा शेत शिवारातील घटना

Robbers' bravery in Parbhani's Parawa Shiwar; Gang rape of female farm worker, fatal attack on family | परभणीत दरोडेखोरांचे कौर्य; शेतमजूर महिलेवर सामूहिक अत्याचार, कुटुंबावर जीवघेणा हल्ला

परभणीत दरोडेखोरांचे कौर्य; शेतमजूर महिलेवर सामूहिक अत्याचार, कुटुंबावर जीवघेणा हल्ला

परभणी : परभणी तालुक्यातील पारवा शेत शिवारामध्ये एका आखाड्यावर अज्ञात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील एका महिलेवर सामूहिक अत्याचार केला. यात कुटुंबातील तिघेही सदस्य जखमी असून अत्याचार झालेल्या महिलेचा पती हा गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी रात्री बारा ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, परभणी तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारवा गाव आहे. या गावाच्या परिसरात एका शेत आखाड्यावर एक कुटुंब सालगडी म्हणून वास्तव्यास आहे. संबंधित आखाड्यावर हे कुटुंब गुरुवारी रात्री घरामध्ये झोपले असताना चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून संबंधित कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांची आई अशा तिघांना बेदम मारहाण केली. यामध्ये अंदाजे ४० ते ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांना खोलीमध्ये डांबून ठेवले. घरातील विविध ठिकाणी पिशवी आणि इतर ठिकाणी ठेवलेल्या साहित्यातील सोने, चांदी असा एवज चोरून नेला.

ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. यानंतर संबंधित घटनास्थळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, चंद्रसेन देशमुख, प्रभारी स्थागुशा पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, श्रीकांत डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.

आरोपी शोधासाठी पथकांची निर्मिती
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ग्रामीण पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हा शाखा यासह अन्य काही विशेष पथके तैनात करून आरोपींचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जखमींवर परभणीमध्ये उपचार
घटनेतील संबंधित अत्याचार झालेली महिला आणि अत्याचार पीडित महिलेचा पती आणि सासू अशा तिघांवर परभणीमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये संबंधित महिलेचा पती हा गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित तिघांचे जवाब घेण्यासाठी भेट दिली.

खोलीत तिघांना डांबून ठेवले
हा प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे पोलीस यंत्रणेकडून स्पष्टपणे सांगण्यात आले नाही. चोरीसाठी आलेल्यांनी मारहाण करून संबंधित कुटुंबातील तिघांना चोरट्यांनी खोलीमध्ये दाबून ठेवले होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी उशिरा हा प्रकार समोर आला. यामुळे पारवा गावासह जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Web Title: Robbers' bravery in Parbhani's Parawa Shiwar; Gang rape of female farm worker, fatal attack on family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.