मोठी बातमी! सिग्लन बिघडवून अजिंठा रेल्वेत लुटीचा प्रयत्न, पोलीस आले अन चोरटे पळाले
By राजन मगरुळकर | Published: May 31, 2023 07:22 PM2023-05-31T19:22:22+5:302023-05-31T19:25:23+5:30
पेडगाव स्थानकाच्या जवळील होम सिग्नलचे टूल बॉक्स तोडल्याचे यावेळी पोलिसांना आढळून आले.
परभणी : मनमाड येथून सिकंदराबादला जाणारी अजिंठा एक्सप्रेस रेल्वे देवलगाव अवचार ते पेडगाव स्थानकाच्या दरम्यान येताना पेडगाव स्थानकाच्या नजीक चोरट्यांनी सिग्नलचे टूल बॉक्स तोडून रेल्वेमध्ये लुटीचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास घडली आहे. यामुळे सिग्नलमध्ये बिघाड झाला. याप्रकरणी रेल्वे पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची रेल्वे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, रेल्वे क्रं (१७०६३) मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्सप्रेस ही रेल्वे नेहमीप्रमाणे दररोज रात्री दीडच्या सुमारास मानवत रोड स्थानकावरून परभणीकडे येण्यासाठी निघाली होती. मानवत रोड नंतर देवलगाव अवचार स्थानक सोडल्यावर पेडगावच्या दिशेने रेल्वे जात असताना पेडगाव स्थानकाजवळील कॉलिंग सिग्नलमध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले. त्यावेळी रेल्वे स्टेशन मास्तर आयुब पठाण यांनी सिग्नलमध्ये बिघाड झाल्याची सदरील माहिती गस्तीवरील जीआरपी पोलीस, आरपीएफ तसेच होमगार्ड यांना दिली.
पेडगाव स्थानकाच्या जवळील होम सिग्नलचे टूल बॉक्स तोडल्याचे यावेळी पोलिसांना आढळून आले. घटनास्थळी पोलीस कर्मचारी अविनाश डावरे, आरपीएफचे विष्णू पंडाळे, जाधव हे त्या ठिकाणी पोहोचले. अज्ञात चोरट्यांनी होम सिग्नलचे टूल बॉक्स तोडून सिग्नलमध्ये बिघाड केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे रेल्वे अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी थांबली होती. आरपीएफ तसेच जीआरपी पोलीस हे बिघाडाच्या ठिकाणी जात असताना चोरट्यांनी तेथून पोलीस पाहून पळ काढला. या घटनेमुळे मध्यरात्री परभणी-मानवत रोड दरम्यान धावणाऱ्या तीन ते चार रेल्वे उशिराने धावल्या. या घटनेत चोरट्यांनी कोणताही ऐवज किंवा चोरी केल्याचे आढळून आले नाही.
एस-६ डब्यावर दगडफेक
मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्सप्रेसच्या सिग्नलमध्ये टूलबॉक्स सोडून बिघाड करून चोरीचा प्रयत्न करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस चोरट्यांच्या दिशेने जात असताना चोरट्यांनी एस -६ क्रमांकाच्या डब्यावर दगडफेक केली. मात्र, यात कोणालाही दुखापत किंवा इजा झाली नाही तसेच कोणताही मुद्देमाल चोरीला गेला नाही.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद
सदरील प्रकरणामध्ये चोरीचा प्रयत्न करणे तसेच सिग्नलचे नुकसान करणे अशा विविध प्रकारामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३४१, कलम ३४६ अंतर्गत जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास नांदेड जीआरपीचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे करीत आहेत.
घटनास्थळी अभियंते, टेलिकॉम यंत्रणेचे अधिकारी
होम सिग्नलचे टूलबॉक्स सोडल्यामुळे झालेल्या प्रकारामुळे रेल्वे काही वेळ एकाच ठिकाणी थांबून होती. या ठिकाणी आरपीएफचे पोलीस अधिकारी वाघ यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारानंतर काही रेल्वे उशिराने धावल्या. यामध्ये नंदिग्राम, साप्ताहिक तिरुपती रेल्वे, नरसापुर रेल्वे या विलंबाने धावल्या. घटनास्थळी दुरुस्तीसाठी टेलिकॉम तसेच विभागातील अभियंते यांनी भेट देऊन त्वरित दुरुस्ती काम केले.