मानोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरे फोडून २ लाखाचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 05:23 PM2019-04-09T17:23:57+5:302019-04-09T17:25:12+5:30
गुंगीच्या औषधाचा वापर केल्याचा संशय
मानोली (परभणी ) : मानवत तालुक्यातील मानोली येथे सोमवारी मध्यरात्री दोन घरे फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिण्यांसह २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मानोली येथील काकडे गल्लीत राहणाऱ्या दत्तराव रामभाऊ मांडे यांच्या घरात सोमवारी (दि.८ ) मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील ७० हजार रुपये व ३ तोळे सोने लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा विठ्ठल ज्ञानेदव मांडे यांच्या घराकडे वळविला. त्यांच्या घरात प्रवेश करून संसारोपयोगी सामानाची नासधूस केली. त्यानंतर पत्र्याच्या पेटीत ठेवलेले ५० हजार रुपये लांबविले. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सेलू येथील पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी सुदाम शेलार, गजानन गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील बबनराव तळेकर, सरपंच ज्ञानोबा शिंदे, उपसरपंच भगवान भांड, नरेश मांडे, सुदाम शिंदे, सुरेश काकडे, वसंत मांडे आदींची उपस्थिती होती.
गुंगीच्या औषधाचा वापर
ही घटना घडत असताना घरातील एकाही सदस्याला या घटनेची कुणकुण लागली नाही. त्यामुळे चोरट्यांनी चोरी करताना गुंगीच्या औषधाचा वापर केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने तत्काळ या घटनेतील चोरट्यांना पकडून कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.