रोबोट करणार शेती; ड्रोन करणार फवारणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:57 AM2019-07-23T11:57:29+5:302019-07-23T12:03:30+5:30
कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी यंत्र मानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे होणार डिजिटल शेती
- प्रसाद आर्वीकर
परभणी : हवामानातील बदल, वारंवार येणारा दुष्काळ, मजुरांचा प्रश्न या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता आपली शेती रोबोटच्याच हवाली केली जाणार आहे. या डिजिटल शेतीच्या प्रकल्पासाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास भारतीय कृषी संशोधन परिषदेने हिरवी झेंडी देतानाच १८ कोटींचा निधीही मंजूर केला आहे़
‘कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी यंत्र मानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती’ या विषयावरील सेंटर आॅफ एक्सलन्स हा प्रशिक्षण प्रकल्प परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेला सादर केला होता़ त्यास या परिषदेचे राष्ट्रीय संचालक डॉ़ राकेशचंद्र अग्रवाल यांनी मंजुरी दिली आहे़ आंतरराष्ट्रीय दर्जाचा देशातील हा एकमेव प्रशिक्षण प्रकल्प असेल. २०१९ ते २०२२ या तीन वर्षांचा हा प्रकल्प असून, या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या १८ कोटी रुपयांपैकी ५० टक्के वाटा जागतिक बँकेचा आणि ५० टक्के वाटा केंद्र शासनाकडून दिला जाईल. या प्रकल्पाची प्राथमिक संकल्पना प्रमुख शास्त्रज्ञ डॉ़ गोपाळ शिंदे यांची असून समन्वयक डॉ़ राजेश कदम आहेत.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार
यंत्र मानव (रोबोट), ड्रोन, स्वयंचलित डिजीटल साधनांचा समावेश असणाऱ्या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण केल्या जातील. विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांना या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण दिले जाईल. हेच कौशल्यप्राप्त प्रशिक्षणार्थी डिजीटल शेतीचे तंत्र पुढे शेतकऱ्यांपर्यंत नेतील. मजुरांचा प्रश्न, निविष्टांचा खर्च, बदलते हवामान, कमी होणारे पाणी या समस्यांवर डिजीटल तंत्रज्ञानाच्या आधारे मात करणे शक्य आहे़ स्वयंचलित वाहनाद्वारे पीक हताळणी, रोगनिदान व उपाय, काढणी व वाहतूक करणे शक्य होईल़ ड्रोनद्वारे कार्यक्षमरित्या पीक पाहणी व निरीक्षण, जमिनीतील शुष्कता, पिकांवरील रोग व निदान, किटकनाशकांची फवारणी हे कॅमेरा व सेंसर तंत्रज्ञानाद्वारे शक्य होईल़ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आवश्यक ती मनुष्यबळ निर्मिती करून रोजगार व स्वयंरोजगार संधी निर्माण केल्या जातील, अशी माहिती कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी दिली.
३०० कौशल्यप्राप्त कृषी उद्योजक निर्माण करणार
चार मुख्य भागांत या केंद्राचे काम चालेल़ त्यात हवामान आधारित डिजीटल ज्ञानात्मक पाठबळ केंद्र, बी-बियाणे प्रक्रिया व रोपवाटिका, स्वयंचलित केंद्र, स्मार्ट पोर्टेबल मशिनरी केंद्र व अन्न प्रक्रिया स्वयंचलित केंद्राचा समावेश आहे़ एक वर्षाच्या या अभ्यासक्रमात यंत्र मानव विभाग, ड्रोन विभाग व स्वयंचलित यंत्रविभाग या तीन विभागांत प्रत्येकी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल़ विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर आणि आचार्य पदवीधारक विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र राहतील. यातून किमान ३०० कौशल्यप्राप्त कृषी उद्योजक निर्माण करण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे़
विदेशी विद्यापीठांशी करार
कृषी विद्यापीठाने अॅग्री रोबोट, अॅग्री ड्रोन्स व अॅग्री स्वयंचलित यंत्राच्या देवाण-घेवाणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी तसेच स्पेन, युक्रेन व बेल्लारूस येथील विद्यापीठांशी करार केला आहे़ पवई व खरगपूर येथील आयआयटीचे नॉलेज सेंटर म्हणूनही सहकार्य लाभणार आहे़