परभणीच्या निधीची रोहित्रे नांदेडला दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:19 AM2018-11-01T00:19:36+5:302018-11-01T00:20:19+5:30
जिल्ह्यातील वीज समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेले विद्युत रोहित्र परस्पर नांदेड जिल्ह्याला दिल्याचा आरोप करीत ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांसह परभणीतील महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कक्षात घेराव आंदोलन केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील वीज समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेले विद्युत रोहित्र परस्पर नांदेड जिल्ह्याला दिल्याचा आरोप करीत ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांसह परभणीतीलमहावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कक्षात घेराव आंदोलन केले़
परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ ग्रामीण भागात १२-१२ तास लाईट राहत नाही़ शेतीला पाणी देण्यासाठीही अडचणी निर्माण होत आहेत़ ग्रामीण भागातील अनेक विद्युत रोहित्र जळाले असून, ते महावितरणकडून तत्काळ बदलून दिले जात नाहीत़ विद्युत रोहित्रांमधील आॅईल संपले आहे़ अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे़ जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून महावितरणने गांभिर्याने विजेची कामे करणे अपेक्षित असताना शेतकºयांना झुलवत ठेवण्याचे काम अधिकारी करीत आहेत़ जिल्हाभरात विद्युत रोहित्र मिळत नसल्याने बुधवारी माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी परभणी येथील महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय गाठले़ यावेळी अधीक्षक अभियंता कार्यालयात उपस्थित नव्हते़ संबंधित अधिकाºयांना माजी आ़ बोर्डीकर यांनी याविषयी जाब विचारला़ जिल्ह्यातील वीज समस्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून रोहित्रांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला; परंतु, या निधीतून १०० रोहित्र नांदेडला पळविण्यात आले़ परभणीच्या निधीतून नांदेडला रोहित्र देण्याचा अधिकार कोणी दिला? या विषयी बोर्डीकर यांनी जाब विचारला़ या आंदोलनानंतर बोर्डीकर यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांची भेट घेतली़ जिल्ह्यातील वीज समस्यांची माहिती त्यांना देण्यात आली़ त्यावर गुरुवारपर्यंत हे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी दिले़ यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़
दोन कोटींचा दिला होता निधी
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने महावितरण कंपनीला सामान्य विकास व पद्धती सुधारणा योजनेंतर्गत ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी देण्याची तरतूद करण्यात आली होती़ त्यापैकी २ कोटी रुपयांचा निधी महावितरणला देण्यात आला आहे़ या निधीमधून घेण्यात आलेले रोहित्र परभणी जिल्ह्यासाठीच वापरण्याऐवजी महावितरणच्या अधिकाºयांनी नांदेड येथील मुख्य अभियंत्यांच्या सुचनेनुसार नांदेड जिल्ह्यालाच दिले असल्याचा बोर्डीकर यांचा आरोप आहे़
बंदी उठविल्यानंतर : आक्रमक भूमिका
४जिल्हा बँकेच्या विमा घोटाळा प्रकरणात माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्यावर न्यायालयाने परभणी शहरात प्रवेशास बंदी घातली होती़ त्यामुळे केवळ न्यायालयीन तारखांच्या वेळीच बोर्डीकर हे परभणीमध्ये येत होते़ १५ आॅक्टोबर रोजी न्यायालयाने ही बंदी उठविली आहे़ त्यामुळे बोर्डीकरांनी आक्रमक भूमिका घेत बुधवारी महावितरणच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले़ यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाºयांवर प्रश्नांचा भडीमार केल्याने अधिकारी भांबावून गेले होते़ त्यामुळे गेल्या चार वर्षांत शांत असलेल्या बोर्डीकरांची आक्रमक भूमिका पाहून उपस्थित कार्यकर्तेही चकीत झाले़ त्यामुळे या पुढील काळातही बोर्डीकर हे जिल्हा बँक असो की इतर संस्था असो तेथेही ते आक्रमक भूमिका घेणार असल्याची भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे़ त्यामुळे त्यांच्या पुढील भुमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींवर बोचरी टीका
४महावितरणमधील घेराव आंदोलनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना माजी आ़ बोर्डीकर म्हणाले की, जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळ पडला आहे़ त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत़ अशामध्ये शेतकºयांना आधार देण्यासाठी त्यांना सुरळीत वीज पुरवठा देणे आवश्यक असताना महावितरणचे अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत़ शेतकºयांना चुकीची बिले दिली जात आहेत़ त्यांची बिले दुरुस्त करून द्या, शेतकरी एक रुपयाही महावितरणचा ठेवणार नाहीत़ उलट महावितरणमध्येच मोठी अनियमितता सुरू असताना जिल्ह्यातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोपही यावेळी बोर्डीकर यांनी केला़