उगवण न झाल्याने कांदा पिकावर फिरविला रोटावेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:54+5:302020-12-07T04:11:54+5:30
पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात रब्बी हंगामात कांदा पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारल्याने उगवण ...
पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात रब्बी हंगामात कांदा पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारल्याने उगवण कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा पेरलेल्या शेतात चक्क ट्रॅक्टर घालून रोटावेटर फिरविले.
पालम तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रबी हंगाम लांबला आहे. पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी कांदा पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहत आहेत. यावर्षी बाजारपेठेत कांदा बियाणे ५ हजार रुपये किलोपर्यंत जाऊनही मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी औरंगाबाद, नाशिक या भागातून बीज उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांकडून खरेदी करून बियाणे आणले होते. एका एकरात ४ किलो बियाणासाठी २० हजार रुपये व रासायनिक खतांसाठी २ हजार रुपये असा २२ हजार रुपयांचा खर्च करून बियाणाची लागवड केली. बोगस बियाणे व अयोग्य हवामान या कारणाने कांदा रोपाची ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात उगवण झाली आहे. त्यामुळे हे पीक शेतात ठेवणे परवडत नसल्याने चक्क रोटावेटर घालून पीक मोडले जात आहे. महागडे बियाणे आणून पेरणी केलेल्या कांद्याला मोडून नवीन पीक घेण्यासाठी जमीन तयार करण्यात येत आहे. खरीप हंगामात फटका बसलेल्या शेतकऱ्यांना रबी हंगामातही पिके साथ देत नसल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.