परभणी वळण रस्त्यासाठी ३९.५५ कोटी रुपयांची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 09:05 PM2018-04-03T21:05:02+5:302018-04-03T21:05:02+5:30
परभणी शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्याला ८४़४५ हेक्टर जमीन संपादित करावयाची असून, यासाठी ३९ कोटी ५५ लाख २४ हजार ३१९ रुपयांची आवश्यता असल्याचा प्रारुप अंदाज जिल्ह्याच्या भूसंपादन विभागाने काढला आहे़
परभणी : परभणी शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्याला ८४़४५ हेक्टर जमीन संपादित करावयाची असून, यासाठी ३९ कोटी ५५ लाख २४ हजार ३१९ रुपयांची आवश्यता असल्याचा प्रारुप अंदाज जिल्ह्याच्या भूसंपादन विभागाने काढला आहे़ त्यामुळे आता हा प्रस्ताव अंतीम करून प्रत्यक्ष भूसंपादनालाच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़
कल्याण-निर्मल हा २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग परभणी शहरातून नांदेडकडे जातो़ शहरामध्ये वाढलेली वसाहत, अरुंद रस्ते आणि त्यावर वाढती वाहतूक लक्षात घेऊन या रस्त्याला शहराबाहेरून वळण रस्ता काढण्याचे निश्चित करण्यात आले़ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या वळण रस्त्याचा आराखडा तयार केला असून, राजपत्रात हा आराखडा प्रसिद्धही झाला आहे़ १४़५ किमी अंतराचा हा वळण रस्ता असून, परभणी, धर्मापुरी, वांगी, असोला आणि पारवा या पाच गावांच्या शिवारातून हा रस्ता जाणार आहे़ महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या आराखड्यानुसार ८४़४५३९ हेक्टर जमीन रस्त्यासाठी संपादित करावी लागणार आहे़
महामार्ग प्राधिकरणाचे काम संपले असून, जमीन संपादनाची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागामार्फत केली जाणार आहे़ त्यासाठी भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ़संजय कुंडेटकर यांनी आठ दिवसांपासून जमीन संपादनाच्या प्रक्रियेला गती दिली़ या रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करावयाची आहे, त्या जमिनीचे मूल्यांकन करणे, खातेदारांची यादी तयार करणे आणि जमिनीचे क्षेत्र मोजून द्यावयाच्या मोबदल्याची प्रारुप रक्कम तयार करण्यात आली आहे़
पाचही गावांमधील शेतकरी खातेदारनिहाय यादी तयार झाली असून, जिल्हा प्रशासनाला आता २५७ खातेदारांच्या ८४़४५ हेक्टर जमीन संपादनासाठी ३९ कोटी ५५ लाख २४ हजार ३१९ रुपयांची आवश्यकता लागेल, असा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे़ त्यामुळे या प्रारुप आराखड्याला अंतीम करून शेतकऱ्यांच्या जमिनी प्रत्यक्ष संपादित करण्याची कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या जमिनीचे अंतिम निवाडे निश्चित झाल्यानंतर जमीन संपादन केले जाईल. त्यानंतरच बाह्य वळण रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे़
गावनिहाय आवश्यक असलेली रक्कम
बाह्य वळण रस्त्यासाठी ५ गावांची जमीन संपादित करावयाची असून, त्यात परभणी शहर परिसरातील सर्वाधिक ४२़१५ हेक्टर जमिनीचा समावेश आहे़ एकूण ५६ शेतकऱ्यांची ही जमीन असून, त्यासाठी १८ कोटी २२ लाख ४५ हजार ६४१ रुपये मावेजापोटी लागणार आहेत़ पारवा शिवारातील १़७६ हेक्टर जमिनीसाठी आठ खातेदार असून, ६९ लाख ५० हजार २०० रुपयांची आवश्यक आहे़ वांगी शिवारातील ५९ शेतकऱ्यांची १५़८९ हेक्टर जमीन घेण्यासाठी ५ कोटी ४४ लाख ८० हजार ५८३ रुपये, असोला शिवारातील ४९ शेतकऱ्यांची १३़९१ हेक्टर जमिनीसाठी ६ कोटी ४० लाख ६५ हजार ५२२ रुपये आणि धर्मापुरी शिवारातील ८५ शेतकऱ्यांची १०़७४३९ हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी सर्वसाधारणपणे ५८ कोटी ७७ लाख ८२ हजार ३७३ रुपयांची आवश्यकता लागणार आहे़
दिवसरात्र काम सुरू
परभणी येथील भूसंपादन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाह्य वळण रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रारुप निवाडा तयार करण्यासाठी आठवडाभरापासून दिवस-रात्र काम केले़ प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचे क्षेत्र निश्चत करणे, त्या जमिनीचे मूल्य काढून हा निवाडा तयार करण्यात आला़ उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल कारकून वर्षा महामुनी, जे़डी़ वाघमारे, लिपिक कैलास मठपती, रोहित जैस्वाल यांनी हे काम पूर्ण केले़
रक्कमेत वाढ होईल
बाह्य वळण रस्त्यासाठी प्रारुप निवाडा तयार करण्यात आला आहे़ या निवाड्यामध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरील विहीर, बोअर, झाडे, घरे, बांधकाम आणि इतर तत्सम मूल्यांकनाची रक्कम गृहित धरली नाही़ त्यामुळे अंतीम निवाडा करताना ही रक्कम समाविष्ट होणार असून, प्रारुप निवाड्यातील रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे
- डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन