४ रुपयांचा मास्क विकला जातोय १० रुपयांना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 07:24 PM2020-11-03T19:24:21+5:302020-11-03T19:25:11+5:30
कोरोनाच्या संसर्गानंतर मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला आहे.
परभणी: शहरातील औषधी दुकानांमध्ये एन. ९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत असली तरी दोन पदरी आणि तीन पदरी मास्क दुपटीपेक्षा अधिक दराने विक्री केला जात आहे. ग्रामीण भागात मात्र एन ९५ मास्कही चढ्या दराने विक्री होत असल्याची बाब सोमवारी केलेल्या पाहणीत दिसून आली.
कोरोनाच्या संसर्गानंतर मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही वस्तूंच्या दरांवर शासनाचे नियंत्रण आले आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने मास्कचे दर जाहीर केले. या पार्श्वभूमीवर शहरातील औषधी दुकानांची पाहणी केली असता एन ९५ मास्क शासकीय दरानुसार विक्री होत असल्याची बाब समोर आली. मात्र दुपदरी आणि तीन पदरी मास्कच्या किंमती दुपटीपेक्षा अधिक असल्याचे पाहणीत दिसून आले. त्याचप्रमाणे अनेक औषधी दुकानदारांनी दुपदरी व तीनपदरी मास्क ठेवणे बंद केले आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून मास्कच्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तपासण्या करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या एक तासात शहरातील विविध भागात मास्कच्या दरांची माहिती घेतली असता दुपदरी आणि तीन पदरी मास्कच्या किंमती अधिक असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे भेट दिलेल्या एकाही औषध विक्रीच्या केंद्रावर शासनाने निश्चित केलेल्या दरांची माहिती दर्शनी भागात लावलेली नव्हती. त्यामुळे नागरिकांनाही शासकीय दराची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. सायंकाळच्या सुमारास पाथरी शहर आणि गंगाखेड शहरात या मास्कच्या दराची पाहणी केली असता दोन शहरात एन. ९५ मास्क चढ्या दराने विक्री होत असल्याचे पाहणीत दिसून आले. दुपदरी व तीन पदरी मास्कही १० रुपये या दराने विक्री झाल्याचे या पाहणीत निष्पन्न झाले.
चार मास्कची एकत्रित विक्री
परभणी शहरातील बसस्थानक परिसरातील एका औषधी दुकानात एन-९५ मास्कच्या दरांची विचारणा केली असता चार मास्क २०० रुपयांना असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात एन ९५ चे दर १९ रुपयांपासून ते ४९ रुपयांपर्यंत निश्चित केले असले तरी प्रति मास्क एक रुपया अधिक घेतला जात आहे. शिवाय चार मास्क एकत्रित विक्री होत असल्याचे दिसून आले.
गंगाखेडमध्ये चढ्या दराने विक्री
गंगाखेड शहरातील दिलकश चौक भागातील औषधी दुकानांवर एन-९५ मास्क ६० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत विक्री होत होते. तसेच याच भागातील एका दुकानावर दुपदरी व तीनपदरी मास्कच्या दरांचा फलक दर्शनी भागात लावलेला होता. तर इतर दुकानांवर हेच मास्क १० रुपयांना विक्री केले जात होते. त्यामुळे मास्कच्या दरात शहरात भिन्नता दिसून आली.
पाथरीत 10 रुपयांना मास्क
पाथरी शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या औषधी दुकानांमध्ये ८० रुपयांना एन ९५ मास्क विक्री होत होते. त्याचप्रमाणे दुपदरी आणि तीन पदरी मास्क प्रत्येकी १० रुपयांना विक्री होत असल्याचे पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे, एकाही दुकानावर शासकीय दर लावलेले नव्हते. त्यामुळे चढ्या दराने मास्कची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यात तपासणीचा अभाव
शासनाने मास्कचे दर जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात या दराने मास्कची विक्री होते का? याची पाहणी झाली नसल्याने अनेक भागात दरांमध्ये तफावत दिसत आहे. या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद असल्याने तपासणीची माहिती मिळू शकली नाही.