८ लाख रुपये, १४ किलो चांदी चोरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:12 AM2021-07-23T04:12:38+5:302021-07-23T04:12:38+5:30
मानवत शहराला लागूनच असलेल्या वळण रस्त्यावर शहरातील उद्योजक गिरीश कत्रुवार यांची राघवेंद्र जिनिंग आहे. जिनिंग परिसरातच एका इमारतीत कार्यालय ...
मानवत शहराला लागूनच असलेल्या वळण रस्त्यावर शहरातील उद्योजक गिरीश कत्रुवार यांची राघवेंद्र जिनिंग आहे. जिनिंग परिसरातच एका इमारतीत कार्यालय आहे. २१ जुलै रोजी जिनिंगचे सर्व काम आटोपून कार्यालय बंद करण्यात आले होते. २२ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता कार्यालयात चिखलाचे पायाने भरलेले ठसे व आतील सामान अस्ताव्यस्त पसरल्याचे जिनिंगमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दिसून आले. याबाबतची त्याने जिनिंगचे मालक गिरीश कत्रुवार यांना माहिती दिली. त्यानंतर कत्रुवार यांनी याबाबत पोलिसांना सांगितले. त्यानंतर घटनास्थळी तातडीने पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, सपोनि भरत जाधव दाखल झाले. त्यांनी कार्यालयात जाऊन पाहिले असता, चोरट्यांनी कार्यालयाचे दार तोडून कपाटात ठेवलेले रोख ८ लाख ७० हजार रुपये व देवघरातील ७ लाख रुपये किमतीच्या १४ किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू लंपास केल्याचे दिसून आले. बुधवारी रात्री पाऊस सुरू असल्याने कार्यालयातील फरशीवर चिखलाने भरलेले पावलाचे ठसे आढळून झाले. या ठशांवरून ५ ते ७ चोर असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने जिनिंगच्या प्रवेशद्वारापर्यंत माग काढला. त्यानंतर श्वान घुटमळले.
दरम्यान, याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी जिनिंगचे मालक गिरीष कत्रुवार यांनी मानवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोनि रमेश स्वामी करीत आहेत.
सीसीटीव्ही सोबत नेले
चोरट्यांनी चोरी केल्यानंतर येथे लावण्यात आलेले सीसीटीव्ही व डीव्हीआर सोबत नेले. त्यामुळे चोरटे सराईत गुन्हेगार असावेत, असा अंदाज बांधला जात आहे.