आरटीओंनी ५७ वाहने केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:27 AM2020-12-05T04:27:17+5:302020-12-05T04:27:17+5:30
परभणी : परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर चालणारी जिल्हाभरात ५७ वाहने जप्त करण्यात आली असून १२ लाख ...
परभणी : परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर चालणारी जिल्हाभरात ५७ वाहने जप्त करण्यात आली असून १२ लाख ८० हजार रुपयांचा दंड वाहनधारकांकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.
वाहनधारकांसाठी परिवहन विभागाने निमावली ठरवून दिली आहे. असे असतानाही अनेक वाहनधारक नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर वाहने चालवीत असल्याची बाब उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीत समोर आली. नोव्हेंबर महिन्यात या विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने विविध ठिकाणी ४८५ वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये ४९ वाहनधारकांकडे कागदपत्रे नसणे, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, असे वाहन चालविणे आदी बाबींमध्ये वाहनधारक दोषी आढळून आले. यावेळी या वाहनधारकांकडून ९ लाख ८७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर १९ वाहने धोकादायकरीत्या रस्त्यावर धावत असल्याचे दिसून आले. ही वाहने पुन्हा रस्त्यावर धावल्यास नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन सदरील वाहने या पथकातील अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.
महिनाभरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २१० वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५९ वाहनधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर ३८ वाहने या विभागातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. १८ वाहनांची नोंदणी निलंबित करण्यात आली असून दोषी आढळलेल्या वाहनधारकांकडून २ लाख ९३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.
लॉकडाऊनमध्येही वसुलीचा आलेख कायम
१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या ८ महिन्यांच्या कालावधीत आरटीओ कार्यालयाच्या वतीने ३५ लाख रुपयांचा दंड विविध माध्यमातून वसूल करण्यात आला आहे. मार्च २०२१ अखेरपर्यंत या कार्यालयाला ९५ लाख रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ८ महिन्यांत ३५ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपास ४२ टक्के वसुली करण्यात आली असल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. २० मार्चपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतरच्या कालावधीत हे कार्यालय काही दिवस बंद होते. त्यानंतरही महसूल वसुलीची या कार्यालयाची कामगिरी चांगली झाल्याचे दिसून येत आहे.