गर्दीत वावरणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:14 AM2021-01-04T04:14:35+5:302021-01-04T04:14:35+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या वाढवली आहे. जास्तीत जास्त नागरिकांना ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या वाढवली आहे. जास्तीत जास्त नागरिकांना तपासण्या करता याव्यात यासाठी केंद्रांची संख्याही वाढविली आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ३ जानेवारी रोजी एक आदेश काढून गर्दीच्या ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक केले आहे.
जिल्ह्यातील खासगी वाहतूक करणारे वाहन चालक, वाहक आणि ऑटोरिक्षा चालकांची तपासणी ५ ते ८ जानेवारी या काळात आरटीओ कार्यालय परिसर व स्टेशन रोडवरील सिटी क्लब या ठिकाणी केली जाणार आहे. ही तपासणी करण्याची जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खानावळी, हॉटेल मालक व हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यासाठी सिटी क्लब स्टेशन रोड परभणी या ठिकाणी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सर्व नागरिकांची तपासणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आणि महानगरपालिकेच्या उपायुक्तांवर देण्यात आली आहे. तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी ५ ते ८ जानेवारी या काळात आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.