पैशांची बॅग हिसकावून पळणारा पडला नालीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:05+5:302021-01-03T04:18:05+5:30
शहरातील रंगनाथ महाराज नगर भागातील रहिवासी विनोद देवराव चव्हाण यांचे गांधी पार्क भागात गुरुकृपा बॅग हाऊस नावाचे दुकान आहे. ...
शहरातील रंगनाथ महाराज नगर भागातील रहिवासी विनोद देवराव चव्हाण यांचे गांधी पार्क भागात गुरुकृपा बॅग हाऊस नावाचे दुकान आहे. ३० डिसेंबर रोजी रात्री ९.१५ वाजता ते दुकान बंद करून दिवसभराच्या व्यवसायाचे ९ हजार ८०० रुपयांचे एका बॅगमध्ये घेऊन घराकडे दुचाकीवरून पुतण्या ओमप्रकाश चव्हाण याच्यासह निघाले होते. पैशांची बॅग ओमप्रकाशकडे होती. ते रंगनाथ नगर भागात आले असता तोंडाला रुमालाने बांधून चेहरे झाकलेल्या दोन व्यक्तींपैकी एकाने विनोद चव्हाण यांच्या चेहऱ्यावर कसला तरी स्प्रे मारला. त्यामुळे त्यांना भयंकर त्रास झाला. त्यानंतर डाव्या बाजूस उभ्या असलेल्या व्यक्तीने पाठीमागे बसलेले ओमप्रकाश यांच्या जवळील पैशांची बॅग हिसकावून घेतली. यावेळी विनोद चव्हाण यांनी त्यास अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्या हातावर लाकडी दंडुका मारला. व सरस्वती नगरकडे पळ काढला. तर स्प्रे मारणार व्यक्ती परदेश्वर मंदिराकडे पळाला. त्याच्या मागे विनोद चव्हाण पळाले. व आरडाओरड केला असता या भागात असलेले अर्जुन कुलथे, पृथ्वीराज देशमुख, अजिंक्य चव्हाण, विशाल यंदे, कांत देशपांडे यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. यावेळी अनेक जण पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच या चोरट्याने हातातील पैशांची बॅग अंधारात कोठे तरी फेकून दिली. व काही अंतरावर हा चोरटा नालीत पडला. त्यानंतर त्याला पकडून विचारपूस केली असता त्याने नाव सय्यद इरफान सय्यद मोहेद्दीन (३०, रा.परळी) सांगितले. त्यानंतर त्याला नानलपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत विनोद चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सय्यद इरफान सय्यद मोहेद्दीन व अन्य एकाविरूद्ध पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.