पाच दिवसांच्या संचारबंदीनंतर खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 04:06 PM2020-08-18T16:06:51+5:302020-08-18T16:13:28+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमुळे ठप्प पडलेली बाजारपेठ सोमवारी सुरळीत झाली.
परभणी : पाच दिवसांच्या संचारबंदीनंतर सोमवारी शहरातील बाजारपेठ सुरू झाली असून, पोळा आणि गणगौरींच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. गांधीपार्क, गुजरी बाजार आणि स्टेशनरोड भागात दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिकांची झुंबड दिसून आली.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ९ ते १४ आॅगस्ट अशी पाच दिवसांची संचारबंदी लागू केली होती. शुक्रवारी रात्री ही संचारबंदी शिथील झाल्यानंतर शहरात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बाजारपेठ सुरू राहिली. मात्र या संदर्भात जिल्हा प्रशासनाचा अधिकृत निर्णय नव्हता. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाहेर पडणे टाळले. सोमवारी मात्र शहरातील बाजारपेठेतील सर्व दुकाने सुरू झाली. विशेष म्हणजे, चहा दुकाने आणि चॅट भांडारही सुरू करण्यात आले. १८ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात पोळ्याचा सण साजरा केला जात आहे. तसेच २२ आॅगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे सण आणि उत्सवाला लवकरच प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारी बाजार फुलला होता. येथील गांधी पार्क भागात मातीचे बैल विक्रीसाठी आले होते. तसेच पूजेचे साहित्य आणि इतर साहित्याचेही स्टॉल्स लागले होते.
सणांचे दिवस असल्याने किराणा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे कच्छी बाजार, अष्टभूजा देवी मंदिर चौक, स्टेशनरोड या भागातील किराणा दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी दिवसभर होती. या काळात सोशल डिस्टन्सचेही जागोजागी उल्लंघन झाले. मात्र मनपाचे कोणतेही पथक शहरात फिरताना आढळले नाही. त्यामुळे सर्रास सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाला होता. एकंदर आठ दिवसानंतर शहरात पुन्हा एकदा बाजारपेठ फुलली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमुळे ठप्प पडलेली बाजारपेठ सोमवारी सुरळीत झाली. येत्या तीन-चार दिवसांमध्ये या गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे प्रशासनाने आताच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे़
बँकेसमोर पुन्हा रांगा
- शहरातील बँकांसमोर लागणाऱ्या ग्राहकांच्या रांगा कमी होत नसल्याची स्थिती आहे. स्टेशनरोडवरील भारतीय स्टेट बँक, महाराष्टÑ बँक, नानलपेठ कॉर्नरवरील आंध्रा बँक या बँकांसह इतर बँकांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
- विशेष म्हणजे, फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन करीत ग्राहक एकमेकांना चिटकून रांगेत उभे होते. बँकेसमोर सोशल डिस्टन्सचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी बँक प्रशासनावर देण्यात आली आहे. मात्र प्रशासन या संदर्भात फारसे गांभिर्याने काम करीत नसल्याची बाब दिसून आली.
- अनेक बँकांनी सुरुवातीला सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी चौकोण आखून दिले जात आहेत़ मात्र त्याचेही पालन होत नाही़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असून, शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जागोजागी वाहतूक ठप्प
सोमवारी शहरात रस्त्यावरही मोठी गर्दी झाली होती. रस्त्या-रस्त्यांवर वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या. स्टेशनरोड, नारायण चाळ, अष्टभूजा देवी मंदिर, शिवाजी चौक या भागात अनेक वेळा वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे बाजारपेठ सुरू होताच शहरातील वाहतुकीच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे.