लोकसभेतील ‘त्याग’, परभणीचे राजेश विटेकर राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आमदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 01:07 PM2024-07-15T13:07:10+5:302024-07-15T13:07:54+5:30

परभणी लोकसभेसाठी ऐनवेळी रासपचे महादेव जानकर यांना महायुतीत ही जागा सोडल्याने राष्ट्रवादीचे राजेश विटेकर बाजूला पडले.

'Sacrifice' in Lok Sabha, Parbhani's Rajesh Vitekar MLA on Legislative Council from NCP! | लोकसभेतील ‘त्याग’, परभणीचे राजेश विटेकर राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आमदार!

लोकसभेतील ‘त्याग’, परभणीचे राजेश विटेकर राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आमदार!

- विठ्ठल भिसे

पाथरी (जि. परभणी) : जिल्ह्याच्या राजकारणात मागील पंधरा ते वीस वर्षांपासून सक्रिय असताना विधानसभा अथवा लोकसभेचा गड जिंकता आला नाही. जोरदार तयारी करूनही रासपच्या महादेव जानकरांसाठी लोकसभेच्या उमेदवारीचा त्याग केला अन् शेवटी विधान परिषदेच्या रूपाने राजेश विटेकर यांच्या गळ्यात आमदारकीची विजयी माळ पडली. एका सुशील व्यक्तिमत्वाला मिळालेल्या या संधीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची मंडळी आनंदाने भारावून गेली आहे.

परभणी जिल्हा व जिल्हा परिषदेच्या राजकारणातच नव्हे, तर सहकार क्षेत्रातही राजेश विटेकर यांच्या घराण्याची छाप राहिली आहे. राजेश यांचे वडील उत्तमराव विटेकर हे सिंगणापूर विधानसभेचे आमदार राहिले. तसेच गंगाखेड पं.स.चे सभापती, परभणी जि.प. अध्यक्ष, बालाघाट कारखाना अहमदपूरचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांचे चिरंजीव राजेश विटेकरांनी मात्र सहकारातून आपली राजकीय सुरुवात केली. गंगाखेड बाजार समिती संचालक, सोनपेठ बाजार समितीचे सभापतिपद २००५ ते २२ पर्यंत सलग भुषविले. २००५ ला विटा खु. या आपल्या गावाचे सरपंचपद मिळविले. त्यानंतर ते २००७ ला जि.प.चे सदस्य झाले. २०१४ ते १७ यादरम्यान जि.प.चे अध्यक्षपदही भूषविले. २०१५ मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकही झाले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या मातोश्री निर्मलाताई याही २०२० ते २२ या काळात जि.प.च्या अध्यक्ष राहिल्या आहेत.

जिद्द सोडली नाही
२०१९ च्या लोकसभेला त्यांनी राष्ट्रवादीकडून परभणी लोकसभेची निवडणूक लढविली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. मागील पाच वर्षांत त्यांनी आपली तयारी कायम ठेवली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीत फूट पडली. राजेश विटेकर यांनी अजित पवार यांचा हात धरला. त्यांना लोकसभेचे उमेदवार म्हणूनही प्रोजेक्ट केले होते. मात्र ऐनवेळी रासपचे महादेव जानकर यांना महायुतीत ही जागा सोडल्याने विटेकर बाजूला पडले. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेवर घेण्याचा शब्द देत विटेकर यांनी लोकसभेत काम करण्याचे आवाहन केले. विटेकरांनी अजित पवार यांच्या शब्दाचा मान ठेवला आणि कामाला लागले. जानकर परभणीत पराभूत झाले. मात्र अजित पवार यांनी विटेकर यांना केलेल्या कामाची पावती म्हणून विधान परिषद उमेदवारी जाहीर केली. २३ मतांचा कोटा पूर्ण करून विटेकर विजयी होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. मागील काही वर्षांपासून यश हुलकावणी देत असल्याने या विजयानंतर कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय उत्कट होत्या.

दुर्राणी गेले अन् विटेकर आले
विधान परिषदेची बाबाजानी दुर्राणी यांच्या रुपाने रिक्त झालेली जागा राजेश विटेकर यांच्या रूपाने परत मिळाली. पाथरी विधानसभेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला यामुळे बळ मिळाले. महायुती आगामी काळात या आमदाराच्या रूपाने फायदा मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

Web Title: 'Sacrifice' in Lok Sabha, Parbhani's Rajesh Vitekar MLA on Legislative Council from NCP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.