कुपटा येथील अनाथ बालकांना शिर्डीतील ‘साई आश्रय’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 04:54 PM2020-03-04T16:54:45+5:302020-03-04T16:59:55+5:30
चार बालकांसह आजीलाही घेतले दत्तक
सेलू (जि. परभणी) : आई-वडिलांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याने अनाथ झालेल्या कुपटा येथील चार बालकांना शिर्डी येथील ‘साई आश्रय’ या आश्रमाने आजीसह दत्तक घेतले आहे.
सेलू तालुक्यातील वाकी शिवारात सालगडी तुकाराम हारके व सविता हारके या दाम्पत्याने १२ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर चार बालकांचे छत्र हरवले. या दाम्पत्याकडे स्वत:च्या मालकीची तीस गुंठे जमीन व पत्र्याची एक छोटीशी खोली एवढीच स्थावर मालमत्ता आहे. आई- वडिलांचे छत्र हरवल्याने या बालकांची उपजिविका कशी करायची? असा प्रश्न त्या बाळांची आजी कौसाबाई माणिकराव हारके यांच्यासमोर पडला होता आणि अचानक साक्षात्कार घडावा त्याप्रमाणे शिर्डी येथील पत्रकार किशोर पाटणी, सबका मालिक एक प्रतिष्ठानचे विश्वस्त गणेश दळवी हे २ मार्च रोजी कुपटा येथे पोहोचले. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैष्णवी (९), ईश्वरी (६), गायत्री (३) आणि भागवत (९ महिने) या चार चिमुकल्या बालकांसह त्यांची आजी कौसाबाई हारके (६५) या पाच जणांची भेट घेतली. आजीसह चारही चिमुकल्यांना दत्तक घेण्याचा निर्णय सबका मालिक एक प्रतिष्ठानच्या साई आश्रय या संस्थेने घेतला आहे.
चारही बालकांसह आजी शिर्डीकडे मार्गस्थ
विशेष म्हणजे, चारही बालकांसह आजीला घेऊन हे पदाधिकारी सोमवारीच शिर्डीकडे मार्गस्थ झाले. या प्रसंगी पोलीस पाटील माणिकराव सोळंके, डॉ. विष्णू दराडे यांची उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या उपस्थितीत कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली.