कर्मभूमीच्या धर्तीवर साई जन्मभूमीचा विकास व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 05:52 PM2020-01-15T17:52:28+5:302020-01-15T17:55:31+5:30
पाथरी येथील नागरिकांच्या अपेक्षा
पाथरी (जि़परभणी) : राज्य शासनाने पाथरी येथील साई जन्मभूमीच्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर शिर्डी येथील काही भाविकांकडून जन्मभूमीबाबत वाद उकरून काढला जात आहे़ त्यामुळे पाथरीतील भाविकांनी नाराजी व्यक्त केली असून, संत साई यांच्या कर्मभूमीच्या धर्तीवर पाथरी येथील जन्मभूमीचाही विकास होत आहे़ त्यात आडकाठी आणू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़
पाथरी येथील संत साई जन्मभूमीच्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील बैठकीत मंजुरी दिल्यानंतर शिर्डी येथील काही भाविकांनी साईबाबांच्या जन्मभूमीचा वाद उकरून काढला़ या पार्श्वभूमीवर रविवारी दिवसभर भाविकांनी पाथरी हेच सार्इंचे जन्मस्थळ आहे़ याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत़ याविषयीची चर्चा करीत शिर्डीतील भाविकांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली़ गोदावरी काठावरील पाथरी तालुक्याचा उल्लेख प्राचीन काळात पार्थपूर, पार्थग्राम असा आढळतो़
पाथरी शहरात साईबाबा यांचा जन्म झाल्याचे संशोधन आणि पुराव्यांनी सिद्ध झाले आहे़ आजही येथील मंदिरात साईबाबांच्या वस्तू जपून ठेवल्या आहेत़ विश्वास टिळक यांनी १९७५ मध्ये साईबाबांच्या जन्मभूमीला भेट देऊन संशोधन सुरू केले़ त्यांच्या संशोधनानंतर अनेक पुरावे त्यांनी जमा केले़ साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी हेच असल्याचे सिद्ध झाले आहे़ विशेष म्हणजे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही पाथरी येथे भेट देऊन साई जन्मभूमीच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या़ आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी रामनाथ कोविंद यांच्याकडे साई जन्मभूमीच्या विकासाचे साकडे घातले़ त्यानंतर राष्ट्रपतींच्या सूचनेवरूनच या जन्मभूमीच्या विकासाचा आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला होता़ तत्कालीन भाजप शासनाने त्यास मंजुरी दिली नाही. मात्र महाविकास आघाडी शासनाने त्यास मंजुरीही दिली़ त्यामुळे या जन्मभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने एक पाऊल उचलले असून, शिर्डीवासीयांच्या विरोधामुळे पाथरीकरांत नाराजी व्यक्त होत आहे़
पाथरी ही जन्मभूमी असल्याचे अनेक पुरावे
शिर्डी ही साईबाबांची कर्मभूमी आहे, तर पाथरी जन्मभूमी आहे, हे अनेक पुरावे आणि संशोधनाने सिद्ध झाले आहे़ कॅनडामधील एका दाम्पत्याने १९९४ साली पाथरीत साईजन्मभूमीचे संशोधन केले़ त्यावेळी सुविधा नव्हत्या़ त्यांच्या संशोधनासाठी मी स्वत: प्रयत्न केले़ त्यानंतर राष्ट्रपती रामराथ कोविंद हे देखील या दृष्टीने सकारात्मक आहेत़ शासनानेही मदतीची भूमिका घेतली आहे़ तेव्हा शिर्डीवासीयांनी जन्मभूमीचा वाद उकरून काढू नये़ शिर्डीच्या रुपात पाथरीचा विकास व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे, असे आ. बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले.