खताची जादा दराने विक्री; परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:08+5:302021-06-19T04:13:08+5:30
पाथरी शहरातील माजलगाव रस्त्यावरील मे. ज्ञानेश्वरी कृषी केंद्र या दुकानदाराने मूळ किमतीपेक्षा जास्त दराने खताची विक्री केल्याची तक्रार पाथरी ...
पाथरी शहरातील माजलगाव रस्त्यावरील मे. ज्ञानेश्वरी कृषी केंद्र या दुकानदाराने मूळ किमतीपेक्षा जास्त दराने खताची विक्री केल्याची तक्रार पाथरी तालुक्यातील किन्होळा येथील एक शेतकऱ्याने ऑनलाईनच्या माध्यमातून जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे १५ जून रोजी केली. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच गुण नियंत्रक निरीक्षक यांनी तपासणी केली. त्यावेळी मे. ज्ञानेश्वरी कृषी केंद्र या दुकानाच्या मालकाने सदर शेतकऱ्याकडून खत विक्री करताना जास्तीची रक्कम घेतल्याचे समोर आले. त्याचबरोबर या दुकान मालकाने ई-पॉस मशीनचा वापर न करता खत विक्री केल्याचे सुनावणीदरम्यान निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. संतोष आळसे यांनी दुकान मालकांचे म्हणणे ऐकून या दुकानाचा खत विक्री केंद्राचा परवाना दोन महिन्यांकरिता म्हणजेच १७ जून २०२१ ते १६ ऑगस्ट २०२१ या काळासाठी निलंबित करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना जादा दराने खत विक्री केली आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना जादाची रक्कम परत करून त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करण्याचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचित केले आहे. या कारवाईमुळे पाथरी शहरातील खत, बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तासाभरात परवाना निलंबित
पाथरी तालुक्यातील किन्होळा येथील एका शेतकऱ्याने शहरातील ज्ञानेश्वरी कृषी केंद्राबाबत ऑनलाईन तक्रार जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक डॉ. संतोष आळसे, जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक एस. व्ही. कपाळे, कृषी अधिकारी डी. टी. सामाले यांनी तासाभरातच दुकान गाठले. घडलेल्या प्रकाराची पाहणी करत दुकानाचा परवाना दोन महिन्यांसाठी निलंबित केला. या कारवाईमुळे कृषी विभागाची कार्यतत्परता दिसून आली.