परभणीत ५० हजार लिटर दुधाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:45 PM2019-10-13T23:45:10+5:302019-10-13T23:45:32+5:30
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी परभणी शहरात सायंकाळपर्यंत सरासरी ५० हजार लिटर दुधाची विक्री झाली असून, यातून एका दिवसांत सुमारे २० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी परभणी शहरात सायंकाळपर्यंत सरासरी ५० हजार लिटर दुधाची विक्री झाली असून, यातून एका दिवसांत सुमारे २० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
परभणी शहरात दररोज साधारणत: २० ते २५ हजार लिटर दुधाची विक्री होते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करुन दुधाचे सेवन केले जाते. घरोघरी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर शहरातील विक्रेत्यांनी दुधाची वाढीव मागणी शनिवारीच नोंदविली होती. पश्चिम महाराष्टÑ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतून शहात पॉकीटबंद दुधाची दररोज आवक होते.
शहरामध्ये १५ ठोक दुध विक्रेते असून, इतर किरकोळ विक्रेत्यांमार्फत शहर परिसरात दुधाची विक्री होते. त्याचप्रमाणे शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातूनही दररोज साधारणत: १५ हजार लिटर दुधाची विक्री होते.
कोजागिरी पौर्णिमेसाठी ठोक विक्रेत्यांनी २० हजार लिटर दुधाची वाढीव मागणी नोंदविली होती. याशिवाय परभणीतील स्थानिक दुध विक्रेत्यांनीही कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने साधारणत: १० हजार लिटर वाढीव दुधाचा साठा केला होता.
पॉकीटबंद दूध आणि स्थानिक उत्पादकांकडील दूध असे दररोज साधारणत: २५ हजार लिटर दुधाची विक्री होते. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने मात्र या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे. गांधी पार्क, वसमत रोड, क्रांती चौक, सुपर मार्केट आदी भागात दूध सायंकाळपर्यंत दुधाची विक्री झाली. कोजागिरीनिमित्त मागविलेल्या वाढीव दुधाची दिवसभरात विक्री झाल्याची माहिती विक्रेते दिलीप शास्त्री यांनी दिली. रविवारी दिवसभर दुधाच्या विक्रीतून केवळ शहराच्या परिसरात सुमारे २० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
निवडणुकांचा झाला परिणाम
४जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांची धामधुम सुरू आहे. या काळातच कोजागिरी पौर्णिमा साजरी होत आहे.
४त्यामुळे गावा-गावात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम पार पडले. मोठ्या खेड्यांमध्ये प्रत्येकी १०० लिटर दुधाची विक्री झाली.
४त्यामुळे यावर्षी कोजागिरीच्या निमित्ताने शहर परिसरातील दुधाच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे.