भाडे तत्वावर दिलेल्या जेसीबी मशिनची केली विक्री; मानवतमध्ये एका विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 07:30 PM2018-12-31T19:30:52+5:302018-12-31T19:31:44+5:30
एका विरोधात मानवत पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानवत (परभणी ) : तालुक्यातील केकरजवळा येथील एका व्यक्तीने आपल्या मालकीची जेसीबी मशिन जालना येथील एकास भाडे तत्वावर दिली. मात्र, भाडेकरूने मशीनची परस्पर विक्री केली. यामुळे एका विरोधात मानवत पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील केकरजवळा येथील मौनोदिन जमाल शेख यांनी जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील रहिवासी खैसरअली सय्यद अशरफ अली यास ऑगस्ट महिन्यात त्यांच्या मालकीची जेसीबी मशीन भाडे तत्वावर दिली. मात्र त्याने मागील चार महिन्यापासून पैस्यांचा हिशोब दिला नाही तसेच विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. खैसरअली सय्यद अशरफ अली याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने शेख यांनी अधिक चौकशी केली. यावेळी त्यांना भाडेकरूने आपल्या जेसीबी मशिनची परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती मिळाली. यावरून शेख यांनी खैसरअली सय्यद अशरफ अली याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.