रेलरोकोसाठी निघालेल्या संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:47+5:302021-07-03T04:12:47+5:30
मराठा समाजाला आरक्षण मंजूर करावे, या मागणीसाठी संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी २ जुलै रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला ...
मराठा समाजाला आरक्षण मंजूर करावे, या मागणीसाठी संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी २ जुलै रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर परभणी रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
नांदेड- अमृतसर ही सचखंड एक्सप्रेस रोखण्याचा प्रयत्न संभाजी सेनेचे कार्यकर्ते करणार होते. शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हे संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात दाखल झाले. त्याचवेळी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे या कार्यकर्त्यांना रेल्वे स्थानकाकडे जाता आले नाही. या आंदोलनात सहभागी झालेले संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर सोळंके,नांदेड जिल्हाध्यक्ष अंगद नेव्हल पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन लव्हाळे, जिल्हा संपर्क प्रमुख नारायण देशमुख , मराठवाडा उपाध्यक्ष ओमप्रकाश लड्डा, दौलत शिंदे, हनुमान भारती, अजय भिसे, कालिदास जावळे, सोनू पवार, गोविंद मोरे, नीलेश भुसारे, विशाल आर्वीकर, महेश जोगदंड पवन कुरील, हनुमान भालेराव, दिनेश जाधव, विष्णू हिवरकर, अभि कदम आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व आंदोलनकर्ते पोलीसांच्या ताब्यात होते. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनामुळे रेल्वेस्थानक परिसरात पोलिसांनी सकाळपासूनच तगडा बंदोबस्त ठेवला होता.