वाढलेल्या दरामुळे बांधकामावरून वाळू गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:20 AM2021-03-01T04:20:05+5:302021-03-01T04:20:05+5:30
गंगाखेड : वाळूचे दर गगनाला भिडलेले असल्याने इमारत, रस्ते व पुलांच्या बांधकामावरून वाळू गायब झाली आहे, तर दुसरीकडे खासगी ...
गंगाखेड : वाळूचे दर गगनाला भिडलेले असल्याने इमारत, रस्ते व पुलांच्या बांधकामावरून वाळू गायब झाली आहे, तर दुसरीकडे खासगी व शासकीय कामावर कृत्रिम वाळूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावर नदीपात्रातील वाळूला दूरदूरपर्यंत मोठी मागणी आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाळू धक्क्यातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत आहे. मागील दोन वर्षांपासून गोदावरी नदीपात्रातील धारासूर, झोला, मैराळ सावंगी, चिंचटाकळी, गौंडगाव, खळी, आनंदवाडी, महातपुरी, दुस्सलगाव, भांबरवाडी, धारखेड, झोला, पिंपरी व मसला या वाळू धक्क्याच्या लिलावाची प्रक्रिया रखडली होती. गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करीत वाळू माफियांकडून अव्वाच्या सव्वा दरात वाळूची विक्री केली जात आहे. वाळू मिळत नसल्याने अनेक बांधकामे ठप्प झाली होती. मात्र, राज्य शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी तालुक्यातील महातपुरी, आनंदवाडी व भांबरवाडी येथील वाळू धक्क्याचा लिलाव झाला आहे. मात्र, या धक्क्यावरील वाळूचा दर गगनाला भिडला आहे. त्यामुळे शहरातील शासकीय इमारत, रस्ते व पुलांच्या कामावर दगड भरडून उत्पादित केलेल्या कृत्रिम वाळूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मात्र, या कृत्रिम वाळूच्या अति वापरामुळे बांधकामाच्या मजबुतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.