तहसीलदारांच्या वेषांतरापेक्षा वाळू माफियांचे जाळे सरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 05:24 PM2018-04-28T17:24:26+5:302018-04-28T17:24:26+5:30
गोदावरी नदीच्या पात्रातील वाळू लिलाव न झालेल्या मुदगल येथून रात्रीच्या वेळी अवैध मार्गाने वाळूचा उपसा मागील काही दिवसांपासून केला जात आहे.
पाथरी (परभणी ) : गोदावरी नदीच्या पात्रातील वाळू लिलाव न झालेल्या मुदगल येथून रात्रीच्या वेळी अवैध मार्गाने वाळूचा उपसा मागील काही दिवसांपासून केला जात आहे. याची दखल घेत पाथरीचे तहसीलदार वासुदेव शिंदे यांनी वेषांतर करून आज सकाळी 8 वाजता या ठिकाणी छापा मारला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. यावरून वाळू माफियांचे जाळे तहसीलदारांच्या वेषांतरापेक्षा सरस ठरल्याचेच चित्र दिसून आले.
पाथरी तालुक्यातील मुदगल येथील गोदावरी नदीच्या पात्रात मागील काही महिन्यांपासून अवैध वाळू वाहतूक मोठया प्रमाणावर केली जाते. महसूल विभागाची नजर चुकवून रात्रीच्या वेळी या पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारी यंत्रणा सक्रिय होते. यांचे वैशिट्य म्हणजे दिवस निघण्यापूर्वी ही टोळी येथून पसार होते. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या,यावरून काही वाहनांवर कारवाई झाली. मात्र, वाळू चोरीचा प्रकार काही थांबला नाही.
तहसिलदारांनी केले वेषांतर
या भागातील वाळू माफियांच्या वाढत्या कारवाया पाहता यावर तहसीलदार वासुदेव शिंदे यांनी स्वतः लक्ष घातले. आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्यांनी शेतकऱ्याच्या वेशात मुदगलच्या पात्रात छापा मारला. मात्र, ते गेले तेव्हा या भागात सगळे आलबेल होते. यावरून वाळू माफियांना तहसीलदारांच्या छाप्याबाबत आधीच कल्पना आल्याची शक्यता नाकारता येत नाही. तहसीलदारांच्या या धाडसी छाप्यापेक्षा वाळू माफियांचे जाळेच अधिक सरस असल्याची चर्चा यावरून आज दिवसभर तालुक्यात होती.
तक्रारीवरून पाहणी
मुदगल येथील पात्रातून अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, ज्या वेळी वेषांतर करून घाट गाठला त्या वेळी एकही वाहन आढळून आले नाही. सोनपेठ भागात काही वाहने दिसत होती. मात्र, हद्द सोडून कारवाई करता येत नाही
- वासुदेव शिंदे, तहसीलदार पाथरी