वाळू तस्करांची पोलिसाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 08:12 PM2017-09-15T20:12:36+5:302017-09-15T20:15:06+5:30
वाळूने भरलेला टिप्पर ठाण्यात का लावला म्हणून दोघांनी चक्क उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या कार्यालयातच एका पोलिसाला मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
पूर्णा (जि. परभणी) : वाळूने भरलेला टिप्पर ठाण्यात का लावला म्हणून दोघांनी चक्क उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या कार्यालयातच एका पोलिसाला मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, पूर्णा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी ए.जी.खान यांनी ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना पूर्णा- चुडावा रस्त्यावर वाळू असलेला टिप्पर (एम.एच.२६-डी ३५८५) पकडला. त्यानंतर तो पूर्णा पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आला व रितसर कारवाई करण्याचे खान यांनी आदेश दिले. टिप्परचालक मधुकर गच्चे यांना याबाबतची कागदपत्रे पोलिसांनी मागितली. परंतु, त्यांच्याकडून ती उपलब्ध झाली नाहीत. या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपी संजय परळीकर व सपकाळ हे दोघे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आले. हेडकॉन्सटेबल अब्दुल रहीम रंगरेज यांना त्यांनी टिप्पर पोलीस ठाण्यात आणून का लावला, याचा जाब विचारला व हुज्जत घातली. यावेळी रहीम यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी खान हे कार्यालयात आल्यानंतर बोला, असे सांगितले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी रंगरेज यांना शिवीगाळ करीत मारहाण केली व टेबलावरील कागदपत्रे फेकून वाळूच्या गाड्या सोडल्या नाही तर तुला व तुझ्या साहेबाला जीवे मारुन टाकीन, असे धमकावले. त्यानंतर अब्दुल रहीम यांनी तातडीने पूर्णा पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती दिली.
दोघेही आरोपी फरार
पूर्णा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी येईपर्यंत दोन्ही आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. याबाबत हेकॉ.अब्दुल रहीम यांच्या फिर्यादीवरुन दोन्ही आरोपींविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.विशाल बहात्तरे करीत आाहेत. आरोपी फरार झाले असून अटकेसाठी पथकाची नियुक्ती करण्यात आलीआहे.