वाळू तस्कराचा महसूल पथकावर धारदार शस्त्राने हल्ला, प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्याने केला प्रतिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 12:08 PM2021-12-16T12:08:53+5:302021-12-16T12:11:09+5:30
तब्बल दोन तासानंतर पोलीस आल्यानंतर तस्कराला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
- विठ्ठल भिसे
पाथरी ( परभणी ) : महसूल विभागाच्या पथकाच्या छापा टाकला असता ट्रॅक्टर पळवून नेत वाळू तस्कराने पथकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची थरारक घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंजरथ येथे घडली. यावेळी प्रसंगावधान राखून पथकातील एका कर्मचाऱ्याने प्रतिकार करत वाळू तस्कराला पडल्याने अनर्थ टळला. तब्बल दोन तासानंतर पोलीस आल्यानंतर तस्कराला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
गोदावरी नदीच्या पात्रात सध्या पाणी असलेले तरीही तरफेच्या सहाय्याने वाळू तस्करी होत आहे. तालुक्यातील मंजरथ शिवारात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. यावरून तहसीलदार सुमन मोरे, मंडळ अधिकारी शिवाजी भरकड यांच्या पथकाने पहाटे 5 वाजता मंजरथ येथील गोदावरीच्या पात्रात छापा टाकला.
यावेळी पथकाला वाळूने भरलेला ट्रॅक्टर दिसून आला. यावेळी तहसीलदार सुमन मोरे यांनी चालकाला ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले. ट्रॅक्टर मालक संदीप सोळंके याने वाळू रस्त्यावर टाकत चालकासह तेथून पळ काढला. हा प्रकार होत असताना महसूल पथकाने तस्करांना ताब्यात घेण्यासाठी ट्रॅक्टरच्या दिशेने धाव घेतली. यावेळी वाळू तस्कर संदीप सोळंके हा हातात धारदार शस्त्र घेऊन पथकावर धावून जात दहशत निर्माण केली.
वाळू तस्कराच्या हातातील धारदार शस्त्र पाहून थकातील कर्मचारी काहीवेळी थबकले. दरम्यान, प्रसंगावधान राखत पथकातील एका कर्मचार्याने तस्कराच्या हातातील शस्त्र हिसकावून घेत त्याला पकडून ठेवले. तहसीलदारांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. तब्बल दोन तास तस्कराला पकडून ठेवण्यात आले. घटनास्थळी पोलिस येताच तस्कराला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.