रांगोळीतून रेखाटलेल्या सावित्रीबाईला अनेक जण भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:14 AM2021-01-04T04:14:51+5:302021-01-04T04:14:51+5:30
देवगाव फाटा : रांगोळी हा खरे तर अल्पजीवी असा कलाप्रकार. तो दीर्घकाळ टीकणारा नसल्याने अनेकांचा यामध्ये उत्साह दिसत नाहीत; ...
देवगाव फाटा : रांगोळी हा खरे तर अल्पजीवी असा कलाप्रकार. तो दीर्घकाळ टीकणारा नसल्याने अनेकांचा यामध्ये उत्साह दिसत नाहीत; पण आजही काही रांगोळी कलावंत असे आहेत, जे जीव ओतून रांगोळी साकारतात. सेलू येथे रूपाली कान्हेकर यांनी अशीच रेखाटलेली हुबेहूब क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चित्राने अनेक जण भारावून गेले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सेलू शहरातील गणेशनगरमधील रूपाली गणेश कान्हेकर यांनी सावित्रीबाई फुले यांची उत्तम रंगवलेली अनोखी रांगोळी रविवारी काढली आहे. रूपाली कान्हेकर यांनी आपल्या घरात ३ बाय ४ फूट या आकारात रांगोळीतून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे चित्र साकारले. रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे. सावित्रीबाई फुलेंची ही रांगोळी अनेकांना भावली.
रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, प्रसन्नभाव आणि उदारता जाणवणे हा आहे. मला बालपणापासूनच रांगोळीचा छंद आहे. माझे पती गणेश कान्हेकर हे मुख्याध्यापक असून त्यांनी प्रोत्साहन दिल्याने मी मनापासून हा छंद जोपासते. खरेतर ही रांगोळी काढण्यासाठी तीन दिवसांत १४ तासांचा वेळ लागला. या रांगोळीबद्दल मला अभिनंदनाचे फोन येणे सुरू झाले आणि जवळपास १०० जणांनी घरी येऊन रांगोळी पाहून माझे कौतुक केले.
रूपाली कान्हेकर, गृहिणी, सेलू