परभणी शहरासाठीचे टंचाई प्रस्ताव लाल फितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 07:18 PM2018-05-11T19:18:08+5:302018-05-11T19:18:08+5:30
पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने तयार केलेला १ कोटी ९३ लाख रुपयांचा टंचाई निवारणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
परभणी : पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने तयार केलेला १ कोटी ९३ लाख रुपयांचा टंचाई निवारणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावास अद्याप मंजुरी न मिळाल्याने शहरातील टंचाई निवारणाची कामे ठप्प पडली आहेत.
परभणी शहराला राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. या बंधाऱ्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी दाखल झाल्याने शहरवासियांना अल्पसा दिलासा मिळाला असला तरी शहरात सध्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे १० ते १२ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. ही योजना ३५ वर्षापूर्वीची जुनी असून शहराच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने योजनेचे पाणी पुरेशा प्रमाणात शहरवासियांपर्यंत पोहोचत नाही. दहा- दहा दिवस पाणी येत नसल्याने टंचाई तीव्र झाली आहे.
शहरातील अनेक भागांत जलवाहिनी पोहोचलेली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना खाजगी बोअरवर अवलंबून रहावे लागते. उन्हाळ्यात भूजल पातळी घटल्याने बोअरही कोरडे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये शहरात टंचाईची परिस्थिती निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन मनपाने उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचा कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यात शहरातील १० विहिरींमधील गाळ काढणे, विहीर खोलीकरण करणे या कामांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. तसेच कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १५ लाख रुपये आणि शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ९४ लाख ६३ हजार रुपये, विंधन विहीर, हातपंपाच्या दुरुस्तीसाठी ३८ लाख ४६ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अर्धा उन्हाळा सरला असून शहरात पाणीटंचाई वाढली आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावास मंजुरी दिली नसल्याने शहरातील टंचाईची कामे ठप्प पडली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे सुरु झाली तर नागरिकांना टंचाईपासून दिलासा मिळणार आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्यातील कामांना मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे.
मनपाने सुरू केला दहा टँकरने पाणीपुरवठा
परभणी शहरातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने महापालिकेने १० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यात १२ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर असून पाच हजार लिटर क्षमतेचे उर्वरित टँकर आहेत. शहरातील भीमनगर, परसावतनगर, संजयगांधी नगर , गौस कॉलनी, झमझम कॉलनी, शिवनेरीनगर, लक्ष्मीनगर, सागरनगर, गालिबनगर, सिंचननगर, धनलक्ष्मीनगर, मराठवाडा प्लॉट, पोस्ट कॉलनी आदी भागात टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे.
हातपंप दुरुस्ती रेंगाळली
शहरामध्ये ६०० पेक्षा अधिक सार्वजनिक हातपंप असून निम्मे हातपंप बंद आहेत. काही हातंपप केवळ साहित्य नसल्याने बंद आहेत. हातपंपांची दुरुस्ती झाली तर पाणीटंचाईवर बऱ्याच अंशी मात होऊ शकते. मात्र मंजुरी अभावी हातपंप दुरुस्तीचे कामही सुरु झालेले नाही.