जलसाठा घटल्याने टंचाईची वाढली तीव्रता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:02+5:302021-04-26T04:15:02+5:30
परभणी : जिल्ह्यातील ८ लघु प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याने या प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होत ...
परभणी : जिल्ह्यातील ८ लघु प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याने या प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या प्रशासनाला आता टंचाईसाठी देखील कामे हाती घ्यावी लागणार आहेत.
जिल्ह्यात यावर्षी कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने पाणीटंचाई निवारणाच्या कामांकडे दुर्लक्ष झाले. उन्हाळ्याला सुरुवात झाली असतानाही प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही.
मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे आतापर्यंत टंचाई जाणवली नाही; परंतु मागच्या काही दिवसांपासून प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होत आहे. जिल्ह्यात एकूण २२ लघु प्रकल्प असून, त्यातील ८ लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत. या प्रकल्पात पाणीच नसल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय ७ प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्क्यांपर्यंत साठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात लघु प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
...हे प्रकल्प कोरडे
परभणी तालुक्यातील पेडगाव, सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी, जिंतूर तालुक्यातील देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, चारठाणा, चिंचोली, आडगाव, केहाळ या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.
बंधाऱ्यांनी अनेक गावांना तारले
प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाला असला तरी गोदावरी नदी पात्रावर असलेल्या बंधाऱ्यांमध्ये मात्र पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या बंधार्यातून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात १६.२७ दलघमी, मुद्गल बंधाऱ्यात ४.५४ दलघमी, ढालेगाव बंधाऱ्याचे ७.३९ आणि तारूगव्हाण येथील बंधाऱ्यात ५.३९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्यावर परिसरातील अनेक गावांची तहान भागविली जात आहे.
मध्यम प्रकल्पात १८ दलघमी साठा
जिल्ह्यात दोन मध्यम प्रकल्प आहेत. त्यात एकूण १८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. जिंतूर तालुक्यातील करपरा प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २८.५ दलघमी असून, प्रत्यक्षात या प्रकल्पात केवळ ८.५२ दलघमी जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे, तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३४.०८ दलघमी असून, या प्रकल्पात सध्या १०.९४ दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये आणखी एक ते दीड महिना पाणी उपलब्ध होऊ शकते.