पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकासासाठी १७८ कोटींचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 01:35 PM2020-02-11T13:35:53+5:302020-02-11T13:52:47+5:30
सोमवारी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी पाथरी येथे स्थळ पाहणी केली़
पाथरी (जि़परभणी) : साई बाबा यांच्या पाथरी येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी नव्याने १७८ कोटींचा आराखडा तयार केला असून, १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत हा आराखडा सादर केला जाणार आहे़ तत्पूर्वी, सोमवारी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी पाथरी येथे स्थळ पाहणी केली़
पाथरी येथील साईबाबा जन्मभूमीच्या विकासासाठी १०० कोटींच्या आराखड्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतर जन्मभूमी बाबत देशपातळीवर वाद निर्माण झाला होता़ शिर्डीकरांनी त्यास विरोध दर्शविला होता़ त्यानंतर शासनाने पाथरी साईबाबा मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता दिली़ त्या अनुषंगाने आता नवीन आराखडा मंजूर करण्यात आला आहे़ राज्य शासनाने पाथरी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात १४ फेब्रुवारी रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित केली आहे़ जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर आणि पाथरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर उपस्थित राहणार आहेत़
टप्प्यात आराखडा
प्रशासनाने साई जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला असून तो १७८ कोटी ५१ लाख ६ हजार २१५ रुपयांचा आहे़ त्याचे चार टप्पे करण्यात आले आहेत़ पहिल्या टप्प्यात ६८ कोटी ६५ लाख ६५ हजार २६८ रुपये, दुसऱ्या टप्प्यात ३८ कोटी १४ लाख ३५ हजार ९०३ रुपये, तिसऱ्या टप्प्यात ४० कोटी ६९ लाख ९९ हजार २७८ रुपये आणि चौथ्या टप्प्यात ३१ कोटी १ लाख ५ हजार १०६ रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे़