शाळांची घंटा वाजणार; ग्रामपंचायत, पालकांच्या एनओसीनंतरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:12 AM2021-07-12T04:12:35+5:302021-07-12T04:12:35+5:30
मागील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत चर्चा ...
मागील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत चर्चा झाली. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे.
या बैठकीपूर्वीच जिंतूर तालुक्यातील चारठाणा सर्कलमध्ये येणाऱ्या काही गावांनी शाळा सुरूही केल्या आहेत. सर्कलमधील ग्रामपंचायतींचे ठराव घेण्यात आले असून, प्रत्यक्ष पालकांच्या संमतीनंतर या सर्कलमधील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता उर्वरित जिल्ह्यात शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. ज्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत, अशा गावांना प्राधान्य देत तेथील सरपंचांचे ठराव घेतले जात आहेत. पालकही शाळा सुरू होण्याबाबत उत्साही आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींचे ठराव आणि पालकांचे संमतीपर्यंत मिळताच जिल्ह्यात पुन्हा एकदा शाळांची घंटा वाजणार असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू
जिल्ह्यातील कोरोनामुक्त असलेल्या गावांतील ग्रामपंचायतींचा शाळा सुरू करण्याबाबत ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षण विभागाकडे आतापर्यंत किती ठराव दाखल झाले, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतीदेखील ठराव देत असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील एकूण शाळांची संख्या १ हजार ७१६ एवढी आहे. त्यातील बहुतांश शाळा दहावीपर्यंतच आहेत.
जिल्हा प्रशासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुमारे दीड हजार शाळा हे वर्ग सुरू करण्यासाठी तयार आहेत.
काही शाळांनी निर्जंतुकीकरण करण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागातून हालचाली सुरू झाल्या असून, सर्व शाळांमधील वर्गशिक्षक तसेच शिक्षक पालकांचे ठराव घेत आहेत. ऑनलाइन स्वरूपाचे हे ठराव दाखल करून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे ग्रामपंचायतींचे ठरावही घेतले जात आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक ती काळजी घेत जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या हालचालींना आता वेग आला असून लवकरच शाळा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.