अनलॉकमध्ये शाळा बंद; शिक्षण सुरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:27+5:302021-06-16T04:24:27+5:30
परभणी : अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शाळा बंद ...
परभणी : अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत १५ जूनपासून सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांना शाळेत शंभर टक्के उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी घरीच असले तरी शिक्षकांना मात्र शाळेत येऊन शैक्षणिक कार्य करावे लागणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. यावर्षी कोरोना कमी होत असल्याने जिल्हा प्रशासन अनलॉकची प्रक्रिया राबवित आहे. सोमवारपासून सर्व व्यवहार नियमित करण्यात आले. मात्र शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष देखील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेऊनच शिकावे लागणार आहे.
भविष्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या लाटेत बालके अधिक प्रमाणात बाधित होतील, असेही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याविषयी अद्याप निर्णय झाला नाही. मात्र माध्यमिक आणि प्राथमिक दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांच्या नावे पत्र काढले असून, १५ जूनपासून सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. याच कालावधीत निकाल तयार करणे, पुढील शैक्षणिक सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया राबविणे यासह इतर कामे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहेत.
गुरुजींची शाळा होणार सुरू
जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नसली तरी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश, ऑनलाइन शिक्षण, निकाल तयार करणे आदी कामे शिक्षक शाळेमध्ये उपस्थित राहून करणार आहेत. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थी उपस्थित नसले तरी शिक्षकांना मात्र उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
शाळा सुरू करायची म्हटली तर...
जिल्ह्यात जवळपास सर्वच व्यवहार पूर्ववत झाले असले तरी शाळांच्या बाबत मात्र अद्याप निर्णय झाला नाही. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने पूर्णवेळ शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे शैक्षणिक वर्षही ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना पार पाडावे लागणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांना मंगळवारपासून शाळेत १०० टक्के उपस्थित राहणे बंधनकारक आहे. विद्यार्थी शाळांमध्ये बोलावण्या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी चर्चा करुन पुढील आदेश निर्गमित केला जाईल, असे पत्र प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविले आहे.