जिल्ह्यातील शाळा, आठवडी बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:33 AM2021-02-21T04:33:08+5:302021-02-21T04:33:08+5:30
परभणी : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्याचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पुन्हा पाचवी ...
परभणी : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्याचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पुन्हा पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा आणि आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील अडीच महिन्यांपासून नियंत्रणात असलेला कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या मागच्या काही दिवसांत वाढली आणि व्यक्त केलेली शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आता प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच आरोग्य विभागाची बैठक घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोरोनाचा संपूर्ण आढावा घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. जिल्ह्यात मास्क आणि फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
दरम्यान, शनिवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील शाळा आणि आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. मागील महिनाभरापासून पाचवी ते नववी आणि अकरावी, बारावी तसेच पदवी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू झाले आहेत. काही शाळांमधील शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने आणि रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात दि. २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व शिक्षकांनी पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाइन साधनांचा वापर करुन अध्यापन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आठवडी बाजारात होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी दि. १५ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
अधिकाऱ्यांवर सोपविली जिम्मेदारी
जिल्ह्यात आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.