दुसऱ्या दिवशीही बाजारपेठांत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:35+5:302021-03-15T04:16:35+5:30
परभणी : जिल्ह्यातील नागरी भागातील बाजारपेठा रविवारी दुसऱ्या दिवशीही कडेकोट बंद ठेवण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला. एकीकडे ...
परभणी : जिल्ह्यातील नागरी भागातील बाजारपेठा रविवारी दुसऱ्या दिवशीही कडेकोट बंद ठेवण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला. एकीकडे बाजारपेठा बंद असताना दुसरीकडे रस्त्यावर मात्र वाहनधारकांची वर्दळ सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नागरी भागात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस संचारबंदी लागू केली होती. शनिवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील नागरी भागातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवत व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. रविवारी बहुतांश नागरी भागात बाजारपेठ बंदच असते. मात्र, मागील काही महिन्यांपासून रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याची पद्धत बंद झाली आहे. त्यामुळे रविवारीही मोठी आर्थिक उलाढाल होते. १४ मार्च रोजी मात्र संचारबंदी लागू असल्याने व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली. सराफा बाजार, किराणा बाजार, कापड लाइन, भुसार मार्केट यासह सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिली. त्यामुळे शहरातील गुजरी बाजार, शिवाजी चौक, कच्छी बाजार, नानलपेठ या नेहमी गजबज असलेल्या भागात शुकशुकाट निर्माण झाला होता.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, नागरिक त्यास गांभीर्याने घेत नसल्याचे रविवारीही दिसून आले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ सुरूच होती. या वाहनधारकांना कोणीही अडविले नाही. त्यामुळे सायंकाळपर्यंत रस्त्यांवर नागरिकांचा बिनधास्त वावर सुरू असल्याचे पाहावयास मिळाले.
दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट
जिल्ह्यात नागरी भागात संचारबंदी असताना दुपारी १ वाजेपर्यंत बहुतांश नागरिक घराबाहेर पडल्याचे पाहावयास मिळाले. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ऊन वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होत असल्याचे दिसत आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने, दुपारच्या सुमारास कडक ऊन पडल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रमुख रस्ते सुनसान झाल्याचे पाहायवास मिळाले.
२०० कोटींची उलाढाल ठप्प
बाजारपेठ बंद राहिल्याने शनिवार आणि रविवार या दोन दिवसांतील जिल्ह्यातील सुमारे २०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. जिल्ह्यातील किराणा, कापड, सराफा बाजारपेठेत दररोज सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होेते. त्यात अनेक किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचाही समावेश आहे. मात्र, दोन्ही दिवस नागरी भागातील बाजारपेठ बंद राहिल्याने, साधारणत: २०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.