दुसऱ्या लाटेत साडेसात टक्क्यांनी वाढला पॉझिटिव्हिटी रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:13 AM2021-07-01T04:13:59+5:302021-07-01T04:13:59+5:30

परभणी : दोन वर्षांच्या कोरोना संसर्ग काळामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ...

In the second wave, the positivity rate increased by 7.5 percent | दुसऱ्या लाटेत साडेसात टक्क्यांनी वाढला पॉझिटिव्हिटी रेट

दुसऱ्या लाटेत साडेसात टक्क्यांनी वाढला पॉझिटिव्हिटी रेट

Next

परभणी : दोन वर्षांच्या कोरोना संसर्ग काळामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक गंभीर होती. या लाटेत ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट ७.४३ टक्‍क्‍यांनी अधिक राहिला. आता तिसऱ्या लाटेचीही धास्ती कायम असून, पुढे काय वाढून ठेवले आहे, याची नागरिकांना चिंता लागली आहे.

मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या काळात कोरोनाची पहिली लाट जिल्ह्यात निर्माण झाली होती. या काळात ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा विचार करता १ हजार ८७४ नागरिकांना लागण झाली. तर ९२ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला. पहिल्या लाटेतील पॉझिटिव्हिटी दर ४.२९ टक्के एवढा राहिला आहे. साधारणतः जानेवारी २०२१ ते मे २०२१ या पाच महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. पाच महिन्यांच्या काळात बाधित रुग्णांची संख्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढली. १८ हजार २०० नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. तर ३८७ नागरिकांना या लाटेत जीव गमवावा लागला. दुसऱ्या लाटेत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ११.७२ टक्के एवढा राहिला. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ७.४३ टक्‍क्‍यांनी पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे.

मार्च २०२० पासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरुवातीला कोरोना नेमका काय आहे, त्यावर उपचार काय करायचे, याविषयी अनभिज्ञता होती. सर्वसामान्य नागरिकांसह वैद्यकीय तज्ज्ञांमध्येही संभ्रमावस्था होती; परंतु पहिल्या लाटेतील अनुभव दुसऱ्या लाटेत उपचार करण्यासाठी कामी आले. असे असले तरी पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट जिल्ह्यासाठी अधिक धोकादायक आणि गंभीर ठरली आहे. अनुभवाची शिदोरी हाती असतानाही या लाटेत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूचा दर कमी करण्यात अपयश आले, हे मान्य करावे लागेल. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही या लाटेमध्ये भरडला गेला आहे.

कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांचा अनुभव जिल्ह्याच्या गाठीशी असून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. काही जणांच्या मते तिसरी लाट अधिक धोकादायक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मागील दोन लाटांनी दिलेले अनुभव तिसऱ्या लाटेमध्ये कितपत उपयोगात येतात, हे येणारा काळच ठरविणार आहे.

२३ टक्क्यांनी वाढले मृत्यू

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जिल्ह्यात ९२ नागरिकांवर मृत्यू ओढावला. दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या ३८७ एवढी आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण २३ टक्क्यांनी वाढले आहे. यावरून दुसरी लाट किती गंभीर होती, हे लक्षात येते.

ग्रामीण भागात २० हजार रुग्ण

कोरोनाच्या दोन्ही लाटांत ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात भरडला गेला असून, २० हजार ७४ रुग्णांना कोरोनाची लागण झाली. तर ४७९ रुग्णांना या दोन्ही लाटांत मिळून जीव गमवावा लागला. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे हे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनीच पुढाकार घेऊन काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: In the second wave, the positivity rate increased by 7.5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.