सेलू बँक चोरी प्रकरण : चार दिवस उलटूनही चोरटे सापडेना; पोलीस पथकांचा तपास सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 06:10 PM2019-02-05T18:10:12+5:302019-02-05T18:10:46+5:30
चोरट्यांनी तिजोरी फोडून तब्बल 19 लाख रुपये रक्कम लंपास केले आहेत.
सेलू (परभणी ) : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेची तिजोरी फोडून तब्बल 19लाख 89 हजार रूपयाची रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यास पोलीसांना घटनेनंतर चार दिवस उलटूनही यश आले नाही. या प्रकरणी पोलिसांची चार पथके तपास करत आहेत.
सेलू- पाथरी रस्त्यावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुख्य शाखा आहे. शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरटय़ांनी बँकेच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून तिजोरी असलेल्या रूममध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिजोरी फोडून तब्बल 19 लाख रुपये रक्कम लंपास केली होती. घटनास्थळी चार चाकी वाहनांची स्टेपनी पोलीसांना आढळली होती.त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मंठा या शहराजवळ टायर फुटलेली बेवारस कार पोलिसांना आढळून आली होती. ही कार चोरीची असल्याची माहिती असून सेलू पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात लावली आहे.
चोरटय़ांच्या शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनने चार वेगवेगळी पथके रवाना केली आहेत.माञ चौथ्या दिवशी ही पथकाला चोरट्यांचा शोध लागलेला नाही. चोरटय़ांनी चोरीत चारचाकी वाहनांचा वापर केला असल्याचा अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित लावले नसल्याने त्यातून धागेदोरे मिळत नाहीत.केवळ एकाच चोरट्यांचा चेहरा थोडा स्पष्ट दिसत आहे. यामुळे तपासाला अधिक कालावधी लागत आहे. तसेच चोरट्यांचे चारचाकी वाहन मंठा शहराजवळ पंक्चर झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या वाहनातून पोबारा केला असल्याची माहिती आहे.