सेलू बाजारपेठ बनली पांढऱ्या सोन्याचे आगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:46+5:302020-12-07T04:11:46+5:30
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच कापूस वेचणीसाठी ही शेतकऱ्यांना चांगलीच कसरत ...
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच कापूस वेचणीसाठी ही शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली आहे. किरकोळ बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी केली जात होती. ४२०० रुपयांपासून ५००० हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केला जात होता. त्यामुळे सीसीआयकडून कापूस खरेदीची प्रतीक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होती. १९ नोव्हेंबरपासून शहरातील एक आणि वालूर येथील एका अशा दोन जिनिंगवर सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. टप्प्याटप्प्याने सीसीआयने कापूस खरेदी केंद्र वाढवत कमाल दर ५ हजार ७२५ रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला. त्यामुळे सेलू बाजार समीतीच्या कापूस यार्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर कापसाची वाहने दाखल होत आहेत. सेलू परिसरासह जालना जिल्ह्यातील परतूर, आष्टी, घनसावंगी, मंठा व बीड जिल्ह्यातील माजलगाव, केज, धारूर तसेच बुलडाणा जिल्ह्यातील लोणार परिसरातून कापूस विक्रीसाठी सेलूत खरेदी केंद्रावर येत आहे. त्यामुळे बाजार समीतीच्या कापूस यार्डात वाहनाच्या रांगा लागत आहेत.
८ जिनिंगवर कापूस खरेदी
शहरांसह तालुक्यात १० कापूस जिनिंग आहेत. सद्य:स्थितीत सीसीआयकडून मनजित, बीबीसी, नूतन, स्वस्तिक, मधुसूदन, ग्लोबल, समर्थ, माऊली, तिरुपती या जिनिंगवर कापूस खरेदी केली जात आहे. दरम्यान, बाजार समितीचा कापूस यार्ड परिसर वाहनांनी भरला आहे. गतवर्षीही सेलू येथे ७ लाख १५ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली होती.
खरेदीत जिल्ह्यात सेलू अव्वल
कापसाची वाहने यार्डात आल्यानंतर प्रतवारीनुसार सीसीआयकडून कापूस खरेदी केली जात आहे. सभापती दिनकर वाघ, उपसभापती सुंदर गाडेकर व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी बाजार समितीचे ३० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी स्वत: उपस्थित राहावे. स्वत: उपस्थित नसल्यास कुटुंबातील सदस्याने आधार कार्ड व शिधापत्रिका घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन बाजार समितीचे सचिव प्रकाश पौळ यांनी केले.