सेलू तालुक्यात महावितरणने २३०० कृषी पंपाचा वीज पुरवठा तोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 07:08 PM2017-12-15T19:08:05+5:302017-12-15T19:09:35+5:30
सेलू तालुक्यात महावितरणने थकबाकी वसूली मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत सुमारे २३०० ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला आहे.तर १४ कृषी पंपधारकाकडून २६ लाख रूपयांची वसूली करण्यात आली आहे.
सेलू : सेलू तालुक्यात महावितरणने थकबाकी वसूली मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत सुमारे २३०० ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला आहे.तर १४ कृषी पंपधारकाकडून २६ लाख रूपयांची वसूली करण्यात आली आहे़
सेलू तालुक्यात १० हजार ४०० कृषीपंप वीज ग्राहक आहेत़ या कृषी पंपधारकांकडे ९० कोटी रूपयांची थकबाकी आहे़ सध्या दुधना प्रकल्पातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे़ सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतक-यांनी गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देणे सुरू केले आहे़ परंतु, महावितरणने थकबाकीधारकांडून वीज बील वसूली मोहीम हाती घेतली आहे़ त्यामुळे कृषी पंप धारक त्रस्त झाले आहेत़ कृषी पंप धारकांकडून वसूलीसाठी महावितरणच्या वतीने पथके नियुक्त केली आहेत.
डिसेंबर महिन्यात वालूर, चिखलठाणा, नांदगाव या उपकेंद्रातील १० हजार ४०० कृषी पंपापैकी जवळपास २३०० कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित केला होता़ या शेतकºयांकडे २२ कोटी रूपयांचे वीज बील थकीत होते़ त्यातील १४०० शेतक-यांनी २६ लाख रूपयांचा भरणा केला़ यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला़ परंतु, वीज पुरवठा तोडलेल्या पंपापैकी ९०० कृषी पंपाचा वीज पुरवठा जोडलेलाच नाही़ सध्या कृषी पंपाना काही ठिकाणी ५ तास तसेच काही उपकेंद्रातून रात्री १० तास तर दिवसा ८ तास वीज पुरवठा केला जातो़ इतर फिडर अंतर्गत येणाºया कृषी पंपाना केवळ ५ तास वीज पुरवठा करण्यात येतो़ रब्बी हंगामातील पिकांचे उत्पन्न पाण्यावर अवलंबून असून महावितरणने ऐन हंगामातच वसूली मोहीमेचा धडाका लावल्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे़
११०० घरगुती ग्राहकांना शॉक
महावितरणने आतापर्यंत ११०० घरगुती ग्राहकांसह ८६ वाणिज्य ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे़ यामध्ये सेलू शहरातील ४५० ग्राहकांचा समावेश असून उर्वरित ग्रामीण भागातील ग्राहक आहेत़ ११०० ग्राहकांकडे अडीच कोटींची थकबाकी आहे़ ८६ वाणिज्य ग्राहकांकडे ६० लाख रूपये थकले आहेत़ आतापर्यंत तालुक्यातील गुळखंड, कुपटा, हातनुर, वलंगवाडी, कुंडी, म्हाळसापूर, डिग्रस, डिग्रसवाडीसह २० ते २५ गावांतील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे़
तालुक्यात पाणी उपलब्ध असल्याने अनेक शेतकºयांनी बोंडअळीग्रस्त कापूस उपटून गहू, हरभरा आदी पिकांची लागवड केली आहे. परंतु, महावितरणच्या वतीने थकबाकी वसुली मोहीम सुरू केल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील कृषीपंप, घरगुती व वाणिज्य ग्राहकांकडून थकीत वसूलीसाठी मार्च पर्यंत महावितरण वसूली मोहिम राबविणार आहे़
- राजेश मेश्राम, उपविभागीय अभियंता, सेलू