'महादेव जानकरांना दिल्लीत पाठवा'; मोदींचा संदेश घेऊन आले देवेंद्र फडणवीस
By मारोती जुंबडे | Published: April 1, 2024 07:52 PM2024-04-01T19:52:01+5:302024-04-01T19:52:48+5:30
परभणी लोकसभा मतदारसंघातून जानकर यांना महायुतीने महाराष्ट्राचे हीत डोळ्यासमोर ठेवून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. : देवेंद्र फडणवीस
परभणी : आजच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट घेवून परभणीकडे निघतेवेळी जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहोत, असे म्हटले. तेव्हा त्यांनी अगदी सहजपणे ‘मी जानकारांची दिल्लीत वाट पाहत आहे, असा संदेश जानकरांसह परभणीकरांना द्या, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीतील महायुतीच्या सभेत सोमवारी सांगितले. महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणीत आले होते. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते.
परभणी लोकसभा मतदारसंघातून जानकर यांना महायुतीने महाराष्ट्राचे हीत डोळ्यासमोर ठेवून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. जानकरांसारख्या वंचित व बहुजन समाजासाठी काम करणाऱ्यास महायुतीच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी व परभणीकरांनी लोकसभेवर पाठवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस केले. यासभेस जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी मंत्री बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, माजी खासदार अॅड. सुरेश जाधव, माजी आ. मोहन फड, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, व्यंकट शिंदे, प्रताप देशमुख, आनंद भरोसे, प्रवीण देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते.
विटेकरांना विधान भवनात नेणार - पवार
राजेश विटेकरला तयारी करायला सांगितली होती. मात्र महादेव जानकर यांना प्रतिनिधित्व देण्याचं महायुतीमध्ये ठरलं. जानकरांनी लोकसभेची जागा मागितली होती. त्यामुळे महायुतीमधल्या सर्व जणांनी प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे ठरविले. त्यानुसार जानकर यांना परभणीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. असे असले तरी मी विटेकरकडे दुर्लक्ष करणार नाही. येणाऱ्या सहा महिन्यात त्यांना विधानभवनामध्ये घेऊन जाणार आहे. यासह जानकरांना मत म्हणजेच थेट मोदींना मत आहे, असे लक्षात ठेवा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.