ब्लॅकमेल करत जेष्ठ वकिलाचा भाडेकरू महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 06:50 PM2021-12-29T18:50:03+5:302021-12-29T18:50:29+5:30
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वकिलाने केला अत्याचार
जिंतूर (परभणी ) : शहरातील एका जेष्ठ वकिलाने अश्लील फोटो व्हायरल करायची धमकी देऊन भाडेकरू महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिंतूर पोलिसात वकीलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वकील संजय कमलाकर चारठाणकर फरार असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
शहरातील आठवडी बाजार रस्त्यावर राहणाऱ्या एका जेष्ठ वकिला विरोधात पिडीतेने 28 डिसेंबर 2021 रोजी फिर्याद दिली आहे. यानुसार, शहरातील जेष्ठ वकील संजय कमलाकर चारठाणकर यांच्या घरामध्ये 2019 साली पीडिता पती आणि मुलांसह भाडेकरू म्हणून राहण्यास आली. वकील चारठाणकर याची पत्नी मुलीच्या शिक्षणानिमित्त लातूरला राहत. दरम्यान, पिडीतेचा पती आणि मुलं घरी नसल्याची संधी साधत वकील चारठाणकर तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करे. तसेच लपून नको त्या अवस्थेतील फोटो काढत असे. दरम्यान, मोबाईलमध्ये काढलेले विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वकील चारठाणकर याने पिडीतेवर अत्याचार केला. अत्याचाराचेही फोटो त्याने मोबाईलमध्ये काढले.
या घटनेनंतर, मी वकील असून माझे कोणीही काहीही करू शकत नाही अशी धमकी देत वारंवार अत्याचार केला. या त्रासाला कंटाळून जून 2020 रोजी पिडीतेने घर बदलले. मात्र, सहा महिन्यांनी पिडीतेच्या वडिलांच्या मोबाईलवर वकील संजय चारठाणकर याने अश्लील फोटो पाठवले. याची माहिती मिळताच पिडीतेने काकासोबत जिंतूरच्या न्यायालयात जाऊन संजय चारठाणकर यास जाब विचारला. यावेळी तू माझ्या मुलीसारखी असून मी तुझे फोटो का व्हायरल करू? असे म्हणून वकील चारठाणकरने त्यांना परत पाठवले.
परंतु, संजय चारठाणकर याने 26 डिसेंबर 2021 रोजी पिडीतेचे अश्लील फोटो भ्रमणध्वनीवरून गावातील अनेक नागरिकांना पाठविल्याचे पिडीतेला समजले. यानंतर पिडीतेने संजय चारठाणकर यांच्याविरोधात तक्रार दिली. यावरून कलम 376,354 (अ),354 (ब),354 (क),504,506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील संजय चारठाणकर फरार असून पुढील तपास पोलिस निरीक्षक जऱ्हाड हे करत आहेत.